भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने तिसऱ्या निर्णायक सामन्यात शानदार खेळ करून संघाला विजय मिळवून दिला. दोघांनी शतकी भागीदारी करून भारताच्या डावाला आकार दिला. फलंदाजीशिवाय पंड्याने गोलंदाजीमध्येही चांगली सर्वोत्तम कामगिरी केली. एकूणच, भारताची सलामीची फळी सपशेल अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांमुळे भारताला मालिका जिंकता आली. ही बाब लक्षात घेऊन माजी भारतीय फलंदाज वसिम जाफरने भारताच्या सलामीवीरांच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सामना संपल्यानंतर ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना वसिम जाफरने संघातील सलामीच्या खेळाडूंच्या अपयशावर प्रकाश टाकला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या त्रिकुटाने संघासाठी केवळ २५ धावा आणि तिसऱ्या सामन्यात ३५ धावा केल्या.

हेही वाचा – ‘खेळ अजून संपलेला नाही!’, जेम्स अँडसरनने केली पुन्हा विराट कोहली विरुद्ध खेळण्याची तयारी

जाफर म्हणाला, “जेव्हाही संघातील पहिल्या तीन फलंदाजांनी भरपूर धावा केल्या तेव्हा भारताची कामगिरी नेहमीच सरस ठरली आहे. मात्र, गेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये असे घडले नाही. विराट कोहली सध्या वाईट फॉर्मशी संघर्ष करत आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मामध्ये देखील हवे तसे सातत्य नाही. ही गोष्ट संघाच्या दृष्टीने डोकेदुखी आहे.”

हेही वाचा – Virat Kohli Form : “मी फक्त २० मिनिटात विराटचा फॉर्म परत आणू शकतो”, भारताच्या माजी दिग्गज फलंदाजाचे वक्तव्य चर्चेत

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात २४७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या १४६ धावांवर बाद झाला होता. तर शेवटच्या सामन्यातही सलामीची फळी अपयशी ठरली होती. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी संघाची धुरा सांभाळली होती.