भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई, विदर्भाचं प्रतिनिधीत्व केलेला वासिम जाफर आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. उत्तराखंडच्या वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदी वासिम जाफरची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने याबद्दल माहिती दिली. आगामी रणजी हंगामापासून वासिम जाफर उत्तराखंडाच्या संघाला मार्गदर्शन करणार आहे.

वासिम जाफरचा अनुभव हा उत्तराखंडातील खेळाडूंसाठी उपयुक्त ठरेल. बीसीसीआयने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही आगामी रणजी हंगामासाठी तयारी सुरु केली आहे, अशी माहिती उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. वसिम जाफर याने भारताकडून ३१ कसोटी आणि २ वनडे सामने खेळला आहे. वसीम हा रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच रणजी ट्रॉफीत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. मार्च २०२० मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. जाफरने २५६ प्रथम श्रेणीच्या सामन्यात ५०.९५ च्या सरासरीने १९ हजार २११ धावा केल्या आहेत.