वेस्ट इंडिजचा संघ जेव्हा मैदानात येतो, तेव्हा त्यांच्याकडून आक्रमक खेळाची अपेक्षा असते. मात्र यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये विंडीज संघाचा सूर कुठेतरी हरवला आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना आज बांगलादेशविरुद्धचा विजय महत्त्वाचा आहे. नाणेफेक गमावलेल्या विंडीजने आज प्रथम फलंदाजी केली. या फलंदाजीदरम्यान संघाचा कप्तान कायरन पोलार्डने एक गोष्ट केली. त्यामुळे पोलार्ड सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

फलंदाजीत खराब फॉर्मशी झुंज देत असलेला विंडीज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड अचानक मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी पोलार्डने १६ चेंडूत केवळ ८ धावा केल्या होत्या. असे मानले जाते, की पोलार्डला फटकेबाजी करता येत नसल्याने त्याने हा निर्णय घेतला. काहींनी त्याला दुखापत झाल्याचेही म्हटले. शेवटच्या षटकात पोलार्ड पुन्हा फलंदाजीला मैदानात आला, त्याने शेवटच्या चेंडूवर मुस्तफिजूरला षटकार ठोकला. पण पोलार्डने मैदान का सोडले होते, याचे कारण गुलदस्त्यातच राहिले. विशेष म्हणजे क्षेत्ररक्षणादरम्यानही पोलार्ड मैदानात उतरला नाही. निकोलस पूरनने संघाचे नेतृत्व केले.

हेही वाचा – दणका..! लाइव्ह शोमध्ये झालेल्या भांडणानंतर पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं शोएब अख्तरसह ‘त्या’ अँकरला…

रिटायर्ड आऊट आणि रिटायर्ड हर्टमधील फरक

सुरुवातीला पोलार्ड रिटायर्ड आऊट झाल्याचे म्हटले गेले. रिटायर्ड आऊट आणि रिटायर्ड हर्ट या दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत. रिटायर्ड हर्टनंतर पॅव्हेलियनमध्ये परतलेला फलंदाज पुन्हा गरजेनुसार फलंदाजीसाठी येऊ शकतो. पण रिटायर्ड आऊटमध्ये असे करता येत नाही.

रसेल डायमंड डकवर बाद

पोलार्ड पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर फलंदाजीला आलेला आंद्रे रसेल पुढच्याच चेंडूवर धावबाद झाला. रसेलने बांगलादेशविरुद्ध एकही चेंडू खेळला नाही आणि टी-२० विश्वचषकात डायमंड डकवर बाद होणारा तो नवववा फलंदाज ठरला. याआधी डॅनियस व्हिटोरी, मोहम्मद आमिर, एम. यार्डी, मिसबाह-उल-हक, तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, विली, मुस्तफिजूर रेहमान हे खेळाडू टी-२० विश्वचषकात डायमंड डकवर बाद झाले आहेत.

विंडीजचा डाव

पदार्पणवीर रोस्टन चेजची झुंजार आणि निकोलस पूरनच्या आक्रमक खेळीमुळे विंडीजने बांगलादेशसमोर २० षटकात ७ बाद १४२ धावा केल्या. ७० धावांच्या आत विंडीजने ख्रिस गेल, एविन लुईस, शिमरोन हेटमायर आणि कायरन पोलार्ड या स्टार फलंदाजांना गमावले. रोस्टन चेजने निकोल पूरनसोबत किल्ला लढवला. चेजने ३९ धावा केल्या, तर पूरनने २२ चेंडूत एक चौकार आणि ४ षटकारांसह ४० धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन, मुस्तफिजूर रहमान, शोरिफुल इस्लाम यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.