रणजी क्रिकेटच्या इतिहासात केरळच्या संघाने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. गुजरातवर 113 धावांनी मात करुन केरळचा संघ पहिल्यांदाच रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. या सामन्यात केरळच्या संजू सॅमसनने दुसऱ्या डावात आपल्या जायबंदी झालेल्या बोटाचा विचार न करता मैदानात येऊन एका हाताने फलंदाजी करण्याचं धारिष्ट्य दाखवलं. संघ आणि खेळाप्रती संजूने दाखवलेल्या निष्ठेचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या केरळला पहिल्या डावात 185 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र गोलंदाजीमध्ये केरळच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरीची नोंद केली. संदीप वारियर, बसिल थम्पी, एम.डी. निधेश यांनी भेदक मारा करत गुजरातचा डाव 162 धावांवर संपवला. पहिल्या डावात 23 धावांची नाममात्र आघाडी मिळवलेल्या केरळची दुसऱ्या डावातही घसरगुंडी उडाली. 171 धावांमध्ये केरळला सर्वबाद करण्यात यश मिळवत गुजरातने स्वतःसाठी 195 धावांचं लक्ष्य मिळवलं. याच डावात संजू सॅमसनच्या बोटाला दुखापत झाली होती. मात्र आपला संघ अडचणीत आलेला असताना त्याने दुखापत विसरुन मैदानात उतरत एका हाताने फलंदाजी केली. या डावात तो भोपळा फोडू शकला नाही, मात्र त्याच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

195 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाला पुन्हा एकदा केरळच्या गोलंदाजांनी सतावलं. बसिल थम्पीने 5 तर संदीप वारियरने 4 बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या डावात गुजरातचा संघ अवघ्या 81 धावांत बाद झाला. केरळने सामना जिंकून पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली असली तरीही सर्वत्र कौतुक संजू सॅमसनचं होताना दिसतं आहे.