IND vs AUS 4th Test Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील २८ वे शतक आहे. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ७५ शतके पूर्ण केली आहेत. कोहलीच्या या शतकाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि ती आज संपली. त्याच्या शतकी खेळीत केवळ ५ चौकाराचा समावेश असून बाकी सर्व धावा त्याने पळून काढल्या आहेत. त्याने २४१ चेंडूत शतक साजरे केले.

उत्कृष्ट लयीत दिसला कोहली, दीर्घ प्रतीक्षा संपली –

भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ मधील प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात केली होती. परंतु तो पुढे नेण्यात यशस्वी झाला नाही. पण अहमदाबादमध्ये कोहलीने आरामात खेळला आणि हळूहळू शतकाच्या दिशेने आपला डाव पुढे नेला. हे त्याचे शतक १२०५ दिवसांनी आले आहे. विराट कोहलीचे कसोटीतील शेवटचे शतक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्ध झळकावले होते. हा सामना कोलकातामध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये त्याने १३९ धावा केल्या होत्या. यानंतर कोहली सातत्तायने शतकी खेळी करत राहिला पण त्याला यश मिळाले नाही. गेल्या १० डावात त्याला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही.

विराट कोहलीची कसोटी कारकीर्द –

विराटने २० जून २०११ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हा पासून कोहलीने आतापर्यंत भारतीय संघासाठी १०८ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ४८ च्या सरासरीने ८३२८ धावा केल्या आहेत. यामध्ये २८ शतके, ७ द्विशतके आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने या कालावधीत कसोटीत ९३१ चौकार आणि २४ षटकारही मारले आहेत.

हेही वाचा – WPL 2023 GG vs DC: दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ गोलंदाजाने रचला इतिहास; अमेरिकेच्या तारा नॉरिसला टाकलं मागे

चौथ्या कसोटीचा चौथा दिवस –

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली. कांगारू संघाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाची फलंदाजीही सुरू आहे. भारताने आतापर्यंत १४१ षटकानंतर ५ गडी गमावून ४११ धावा केल्या आहेत. विराट कोहली ११० आणि अक्षर पटेल ६ धावांवर खेळत आहेत.