आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकातून बांगलादेशचा संघ बाहेर पडणे ही क्रिकेटसाठी अत्यंत दु:खद घटना असल्याचे मत जागतिक क्रिकेट संघटनेने (डब्ल्यूसीए) व्यक्त केले असून, या घटनेवर खोलवर चिंतन होणे आवश्यक असल्याचेही नमूद केले आहे. ‘डब्ल्यूसीए’ जागतिक खेळाडू संघटना म्हणूनही ओळखली जाते.
आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतात न खेळण्याच्या भूमिकेवर अडून राहणे बांगलादेशला भोवले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यांना स्पर्धेबाहेर करताना त्यांच्या जागा स्कॉटलंडला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) त्यांच्या संघाचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळविण्याची मागणी केली होती. मात्र, स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना ही मागणी मान्य करणे शक्य नसल्याचे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले. या सगळ्यावर आता ‘डब्ल्यूसीए’नेही भाष्य केले आहे.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकातून बांगलादेशची माघार आणि त्यामुळे क्रिकेटच्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेत एका महत्त्वाच्या क्रिकेट राष्ट्राची अनुपस्थिती, हा आपल्या खेळासाठी, बांगलादेशी खेळाडूंसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी दु:खद क्षण आहे,’’ असे ‘डब्ल्यूसीए’च्या निवेदनात मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम मोफाट म्हणाले.
बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला ‘आयपीएल’मधून बाहेर केल्यानंतर भारतातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत ‘बीसीबी’ने संघाला भारतात पाठवण्यास नकार दिला. मात्र, भारतात बांगलादेश संघ, अधिकारी किंवा चाहत्यांसाठी कोणताही सुरक्षा धोका नसल्याचे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले आणि स्पर्धेचे वेळापत्रक बदलणे योग्य ठरणार नाही असे नमूद केले. “प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडूला सन्मानाने व समान वागणूक मिळते, तेव्हाच क्रिकेट अधिक मजबूत होते,” असेही मोफाट म्हणाले.
‘आयसीसी’ संचालक मंडळाच्या बैठकीत ‘बीसीबी’चा विश्वचषकातील त्यांचे सामने श्रीलंकेत हलविण्याचा प्रस्ताव १४-२ अशा बहुमताने फेटाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूसीए’ने सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन क्रिकेटच्या दीर्घकालीन हितासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे.
‘डब्ल्यूसीए’बाबत…
‘डब्ल्यूसीए’ ही एक व्यावसायिक क्रिकेटपटूंसाठीची जागतिक संघटना आहे, ज्यात अनेक देशांतील खेळाडू सदस्य आहेत. परंतु भारतीय क्रिकेटपटू ‘डब्ल्यूसीए’चे सदस्य नाहीत.
खेळाडूंच्या हक्कांची पायमल्ली
‘डब्ल्यूसीए’ने अलीकडील काळात करारांचे उल्लंघन, खेळाडूंच्या हक्कांची पायमल्ली आणि खेळाडूंशी सल्लामसलतीचा अभाव याबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशातील हंगामी सरकार आणि बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) त्यांच्या खेळाडूंचे मत न विचारात घेताच ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतात न जाण्याबाबत निर्णय घेतल्याचे समोर आले होते. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सहभागाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी ‘आयसीसी’ने दिलेल्या मुदतीपूर्वी बांगलादेश सरकार, ‘बीसीबी’ आणि खेळाडू यांच्यात बैठक झाली होती. मात्र, त्यात बांगलादेशचे राष्ट्रीय क्रीडा सल्लागार आसिफ नझरुलच बोलत होते. त्यांच्यासमोर खेळाडूंनी शांतच राहणे पसंत केले, असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते.
