टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित शर्माने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. शाहिन आफ्रिदीने टाकलेल्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर खातं न खोलता रोहित शर्मा बाद झाला. शाहिन आफ्रिदीने त्याला शून्यावरच पायचीत केलं. यामुळे टी २० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या पंगतीत आघाडीवर आहे. आतापर्यंत रोहित शर्मा ७ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

रोहित शर्मानंतर केएल राहुल ४ वेळा, विराट कोहली ३ वेळा, ऋषभ पंत ३ वेळा, युसूफ पठाण ३ वेळा, सुरेश रैना ३ वेळा, आशिष नेहरा ३ वेळा आणि वाशिंग्टन सुंदर ३ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

रोहित शर्मा टी २० वर्ल्डकपमध्ये गोल्डन डकवर बाद होणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दिनेश कार्तिक २००७ मध्ये, मुरली विजय २०१० मध्ये, नेहरा २०१० मध्ये आणि सुरेश रैना २०१६ मध्ये शून्यावर बाद झाले आहेत.

भारताचा पाकिस्तान विरुद्धचा डाव

केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी भारतासाठी सलामी दिली. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदीने हिटमॅन रोहित शर्माला शून्यावर पायचीत पकडले. तर तिसऱ्या षटकात त्याने राहुलला क्लीन बोल्ड केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने सूर्यकुमारला यष्टीपाठी झेलबाद केले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने सुंदर झेल घेतला. ६ षटकात भारताने ३ बाद ३६ धावा केल्या. या पडझडीनंतर विराट कोहली आणि ऋषभ पंतने भारतासाठी किल्ला लढवला. १२व्या षटकात पंतने हसन अलीला लागोपाठ २ षटकार खेचले. या षटकात विराट कोहली-ऋषभ पंतने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पुढच्याच षटकात पंतने आक्रमक अंदाजात शादाब खानला मोठा फटका खेळला, पण तो झेलबाद झाला. पंतने २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. १५व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले, तर १८व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात आफ्रिदीने विराटला बाद केले. विराटने ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. २० षटकात भारताने ७ बाद १५१ धावा केल्या. हरीस रौफने पाकिस्तानसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात ७ धावा दिल्या. आफ्रिदीने ३१ धावांत ३, तर हसन अलीने ४४ धावांत २ बळी घेतले.