‘विश्वचषक आमचाच’, अशी गर्जना करीत भारतात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ‘आम्हाला तोड नाहीच’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ हे दाखवून दिले. भेदक मारा आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी श्रीलंकेला १३१ धावांमध्ये गुंडाळले. राचेल हायेन्सच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान लीलया पेलत श्रीलंकेवर ९ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान पक्के झाले आहे. साखळी फेरीतून ‘सुपर-सिक्स’ फेरीमध्ये जाताना ऑस्ट्रेलिया ‘ब’ गटात अव्वल स्थानावर होती. त्यानंतर ‘सुपर-सिक्स’मधल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली आहे. ‘सुपर-सिक्स’मधील सलग दुसऱ्या पराभवाने श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. अद्भुत गोलंदाजीचा नजराणा पेश करणाऱ्या फिरकीपटू एरिन ओसबोर्नला या वेळी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि श्रीलंकेचा १३१ धावांत खुर्दा उडवत त्यांनी हा निर्णय चोख असल्याचे दाखवून दिले. मेगन हंटरने सुरुवातीलाच श्रीलंकेला दोन हादरे दिले आणि त्यामधून त्यांचा संघ सावरू शकला नाही. दीपिका रसंगिकाने ७ चौकारांच्या मदतीने ४३ धावांची खेळी साकारत संघाची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ न लाभल्याने श्रीलंकेला जास्त धावा करता आल्या नाहीत. एरिन ओसबोर्नने तळाच्या तीन फलंदाजांना बाद करत श्रीलंकेच्या शेपूट झटपट गुंडाळले. १० षटकांमधली सहा षटके निर्धाव टाकत तिने फक्त ९ धावांत ३ बळी मिळवले.
मेग लॅनिंग (३७) आणि हायेन्स यांनी ५५ धावांची सलामी देत श्रीलंकेला विजयापासून दूर केले. लॅनिंग बाद झाल्यावर हायेन्सने ६१ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारत संघाच्या विजयावर सहजपणे शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ४५.२ षटकांत सर्व बाद १३१ (दीपिका रसंगिका ४३; एरिन ओसबोर्न ३/९) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया २२.२ षटकांत १ बाद १३२ (राचेल हायेन्स नाबाद ७१; स्रीपाली वीराकोडी १/२१)
सामनावीर : एरिन ओसबोर्न.