Tilak Varma On India vs Pakistan Match: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. तो भारत- पाकिस्तान सामना अखेर खेळवला जाणार आहे. हा सामना येत्या १५ फेब्रुवारीला श्रीलंकेतील कोलंबोत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला होता. पण शेवटी पाकिस्तानने हा सामना खेळण्यास होकार दिला आहे. दरम्यान नामिबियाविरूद्धच्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तिलक वर्माने भारत- पाकिस्तान सामन्यावर आपलं मत मांडलं आहे.
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तिलक वर्मा म्हणाला, “खरं सांगू तर, हा सामना खेळण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत. सामना होणार आहे, हे आम्हाला काल समजलं. आम्ही खेळण्यासाठी तयार आहोत. आम्ही सर्व संघातील गोलंदाजांवर आणि फलंदाजांवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही ‘मॅच झोन’ मध्येच आहोत.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे बघूया काय होतं. आमच्याकडे व्हिडिओ विश्लेषण आणि तंत्रज्ञान आहे, त्यामुळे आम्ही कसे खेळत आहोत हे आम्ही पाहू. खेळपट्टी कोणाला साथ देणार , त्यानुसार आम्ही तयार आहोत. प्रत्येक संघाचे खेळाडू वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळतात. आम्हाला या विकेटवर कोणते शॉट्स खेळायचे आहेत आणि कोणत्या गोलंदाजांना कसे सामोरे जायचे आहे, याची योजना आधीच तयार आहे.” तिलक वर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर होता. पण तो फिट झाला असून संघात परतला आहे. अमेरिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याला चांगली सुरूवात मिळाली होती. पण तो २५ धावा करुन माघारी परतला होता. पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. याआधी आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात तिलक वर्माने निर्णायक खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. यावेळीही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
बांगलादेशने सुरक्षेच्या कारणामुळे भारतात येऊन टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार दिला होता. शेवटी बांगलादेशने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताविरूद्ध खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. पण त्यांनी भारताविरूद्ध खेळण्यास नकार दिला होता. पण अखेर पाकिस्तानला आपला निर्णय बदलावा लागला आहे. भारत- पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला होणार आहे.

