Suryakumar Yadav On India vs Pakistan Match: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर ठरलेल्या वेळापत्रकानुसार १५ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पण पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना २५ फेब्रुवारीला कोळंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. पण भारतीय संघ हा सामना खेळण्यासाठी तयार आहे आणि कोलंबोला जाणार, अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली आहे.पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
पाकिस्तानचा संघ भारत – पाकिस्तान सामना वगळता इतर सर्व सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्ही सामना खेळण्यास नकार दिलेला नाही. नकार त्यांनी दिला आहे. आयसीसीने आणि बीसीसीआयने ठरवलं आहे. दोन्ही संघांचे सामना न्यूट्रल वेन्यूवर खेळवले जाणार आहेत. आमची फ्लाईट बुक आहे. आम्ही तर जातोय.” पाकिस्तानने सामना खेळण्यास नकार दिला असला तरीदेखील भारतीय संघ हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. असं सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे.
तसेच तो पुढे म्हणाला, “हा निर्णय त्यांनी घेतला आहे, याबाबत मी काहीच करू शकत नाही. आम्ही त्यांच्याविरुद्ध ३ सामने खेळलो आहे आणि तिन्ही सामने जिंकले आहेत. जर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच खेळू.” याआधी झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला होता. भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारून जेतेपदाचा मान पटकावला होता. आता भारत – पाकिस्तान सामना होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

