Vaibhav Sooryavanshi Emotional Post: आयपीएल २०२६ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. न्यू चंदिगडमध्ये पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ या सामन्यात फलंदाजीत संघर्ष करताना दिसून आला. त्याने पहिल्यांदाच १८ व्या षटकापर्यंत फलंदाजी केली आणि संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली. त्याचं शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं. पण राजस्थानचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करू शकले नाहीत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. दरम्यान हा सामना झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक भावुक स्टोरी शेअर केली आहे.
राजस्थान रॉयल्स संघात अनुभवी फलंदाज होते, पण ते फ्लॉप ठरल्यानंतर वैभवने अनेकदा आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिले. या सामन्यातही त्याने पूर्ण जोर लावला, पण गोलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. आयपीएल फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी हुकल्यानंतर वैभवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
वैभव सूर्यवंशीने लिहिले की, “मला अजूनही विश्वास बसत नाहीये, २० षटकात सर्वकाही कसं बदलू शकतं. आजची रात्री खूप दुःख देणारी आहे. दुःख आहे, राग आहे नाराजी आहे आणि बरंच काही आहे. शुबमन गिल आणि गुजरात टायटन्सला विजयाचं श्रेय द्यायला हवं, त्यांनी खरच चांगला खेळ केला.”
तसेच त्याने पुढे लिहीले की, “मी सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी या युवा खेळाडूंच्या संघावर विश्वास दाखवला, आमच्यासोबत उभे राहिले आणि सर्व १६ सामन्यांमध्ये आम्हाला पाठिंबा दिला. आमच्याकडे आभार मानायला शब्द नाहीत. आम्हाला माफ करा… वाईट वाटतंय, आम्ही तुम्हाला ते देऊ शकलो नाही ज्याचे तुम्ही हकदार आहात. आम्ही तुम्हाला निराश केलं.”
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ९६ धावांची खेळी केली. तर त्याला साथ देत रवींद्र जडेजाने नाबाद ४५ धावा केल्या. शेवटी डोनोवन फरेराने नाबाद ३८ धावा करून संघाची धावसंख्या २१४ धावांवर पोहोचवली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २० षटकात २१४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सकडून शुबमन गिलने शतक झळकावलं आणि साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी करून गुजरातला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
