‘दवाचा मुद्दा फार मोठा नव्हता. हैदराबादच्या फलंदाजांनी उत्तम फटके खेळले. आम्ही वाईट चेंडू टाकले. एकूणात आम्ही खराब खेळलो’, अशी स्पष्ट कबुली मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने दिली. मुंबई इंडियन्सने रायल रिकलटनच्या शतकी खेळीच्या बळावर २४३ धावांचा डोंगर उभारला. सनरायझर्स हैदराबाद संघाने ८ चेंडू आणि ६ विकेट्स राखून हे लक्ष्य किरकोळ ठरवलं. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिच क्लासन या विजयाचे शिल्पकार ठरले. या मानहानीकारक पराभवानंतर गुणतालिकेत मुंबईचा संघ नवव्या स्थानी आहे. ८ पैकी मुंबईला केवळ दोन सामन्यात जिंकता आलं आहे. प्रत्येक पराभवागणिक मुंबईच्या प्लेऑफ्सच्या आशा मावळत चालल्या आहेत. हार्दिकने सामन्यानंतर बोलताना काय चुकलं यासंदर्भात भावना व्यक्त केल्या.

हार्दिक म्हणाला, ‘माझ्या गोलंदाजीत सुधारणा झाली आहे. मैदानावर गोलंदाजी करताना मजा आली. २४३ धावा केल्यावर त्यांचा बचाव करू असा विश्वास होता पण तसं झालं नाही. आम्ही डावपेच आखले होते पण गोष्टी तशा घडल्या नाहीत. शेवटचे तीन चेंडू सोडले तर बाकी माझी गोलंदाजी चांगली झाली. आमच्यासाठी हा हंगाम अशाच पद्धतीचा आहे. संधी मिळते, त्याचं सोनं करायला हवं. आम्ही संधी वाया दवडल्या. जेव्हा असं होतं तेव्हा जिव्हारी लागतं. चाहते आम्हाला भरभरून पाठिंबा देतात पण यंदाच्या हंगामात त्यांनी कौतुक करावं असं आम्ही खेळलेलो नाहीत. गोलंदाजांवर खापर फोडणार नाही. हे आमचं एकत्रित अपयश आहे. मुंबई इंडियन्सचा संघ ज्यासाठी ओळखला जातो तो खेळ आम्ही करू शकलो नाही. संघमालक, सपोर्ट स्टाफ यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. पुनरागमन कसं करायचं यावर विचार करू. चाहत्यांचं प्रेम यापुढेही महत्त्वाचं असणार आहे. प्रतिस्पर्धी संघ येतो आणि ते त्यांची नावं पुकारू लागतात तेव्हा वाईट वाटतं. आम्ही चांगलं खेळायला हवं’.

हार्दिक पंड्या,सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचं अपयश मुंबईसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. दुसरीकडे हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीतून सावरण्याची प्रतीक्षा याही सामन्यात कायम राहिली. पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला यंदा सूरच गवसलेला नाही. टीम इंडियाचं प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहला विकेट्स मिळवण्यात अपयश आलं आहे. अनुभवी ट्रेंट बोल्टला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.