Womens Asia Cup 2026: दुबईत सध्या महिला आशिया कप २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारे ४ संघ जवळजवळ ठरले आहेत. पाकिस्तान आणि हाँगकाँग या दोन्ही संघांदरम्यान झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ७२ धावांनी विजय मिळवून सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. या सामन्यानंतर पाकिस्तानच्या महिला संघाचा प्रशिक्षक वाहब रियाज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांशी चर्चा करताना दिसून आला. यादरम्यान त्याने पाकिस्तान संघाला सपोर्ट करण्यासाठी चाहत्यांचे आभार मानले. यादरम्यान एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याने वाहब रियाजकडे खास मागणी केली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी क्रिकेट चाहते, वाहब रियाजसोबत चर्चा करताना दिसून येत आहेत. व्हायरल व्हिडीओनुसार, एक चाहता वाहबला म्हणतो, “वाहब भाई, भारताला हरवण्यासाठी जोर लावा, भारताला हरवायचं आहे. आम्हाला आशिया चषकाची ट्रॉफी नको, आम्हाला फक्त भारताला हरवायचं आहे.” यादरम्यान वाहब रियाज त्यांना काहीतरी सांगताना दिसून आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय संघाकडून दारूण पराभव

भारतीय संघाला हरवण्याची स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला भारताने आधीच धूळ चारली आहे. या स्पर्धेत ५ सप्टेंबरला झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेला पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला होता. दोन्ही सलामीवीरांना वगळलं, तर इतर कुठल्या फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नव्हता. ४ फलंदाज तर शून्यावर माघारी परतले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ३ गडींच्या मोबदल्यात ६८ चेंडूं शिल्लक ठेवून एकतर्फी विजयाची नोंद केली होती.

भारत- पाकिस्तान फायनलमध्ये पुन्हा भिडणार?

हाँगकाँगला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानचा सेमीफायनलचा सामना बलाढ्य श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पण हे काम पाकिस्तानसाठी मुळीच सोपं नसणार आहे. कारण पाकिस्तानला या संपू्र्ण स्पर्धेत आपली छाप सोडता आलेली नाही. तर दुसरीकडे गतविजेता श्रीलंकेचा संघ तुफान फॉर्ममध्ये आहे.