न्यूझीलंडच्या संघाने टी२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये आगेकूच केली आहे. न्यूझीलंडला सेमी फायनल प्रवेशासाठी गणितीय समीकरणांवर अवलंबून राहावं लागलं. पाकिस्तानचा संघ श्रीलंकेला १४७ धावांत रोखू शकला नाही आणि न्यूझीलंडचा सेमी फायनलचा मार्ग सुकर झाला. सेमी फायनलच्या लढतीत न्यूझीलंडसमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. मात्र या लढतीत त्यांना मुख्य वेगवान गोलंदाजाविना खेळावं लागू शकतं.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॉट हेन्री भन्नाट फॉर्मात आहे. पहिल्याच षटकात प्रतिस्पर्धी संघाला दणका देण्याची त्याची पद्धत आहे. शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या लढतीनंतर हेन्री मायदेशी परतला आहे. पत्नीच्या बाळंतपणावेळी तिच्याबरोबर राहायचं असल्याने हेन्रीने परतीचं विमान पकडलं. त्यावेळी न्यूझीलंडचा संघ सेमी फायनलसाठी पात्र झाला नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. न्यूझीलंडचा संघ कोलकाता इथे दाखल झाला आहे. बुधवारी कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानावर त्यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मुकाबला आहे. या लढतीत हेन्री खेळू शकेल का याबाबत साशंकता आहे.
यासंदर्भात न्यूझीलंडचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी अधिक माहिती दिली. ‘मॉट सुरक्षित घरी पोहोचला आहे. सध्याची परिस्थिती अस्थिर आहे याची आम्हाला कल्पना आहे. मॉट पत्नीच्या बाळंतपणासाठी तिथे गेला आहे. ते सुखरुप होईल अशी आम्हाला आशा आहे. त्याचं तिथे असणं महत्त्वाचं आहे. सगळं ठरल्याप्रमाणे जुळून आलं तर मॉट मंगळवारी कोलकाता इथे असेल. अर्थात यासाठी बऱ्याच गोष्टी जागेजमी असणं आवश्यक आहे. तो सेमी फायनलची लढत खेळू शकेल अशी आम्हाला आशा आहे. पण तो वेळेत परतू शकला नाही तरी आम्ही तयारी केली आहे. कायले जेमिसन, जेकब डफी असे दर्जेदार गोलंदाज आमच्याकडे आहेत. मॉट वेळेत पोहोचू शकला नाही तर त्याची उणीव नक्कीच भासेल पण जेमिसन, डफी, लॉकी फर्ग्युसन हे वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळण्यास तय्यार आहेत’, असं वॉल्टर यांनी सांगितलं.
हेन्रीने टी२० वर्ल्डकप स्पर्धेतल्या सातही लढती खेळल्या असून यामध्ये ७ विकेट्स पटकावल्या आहेत. इकॉनॉमी ७.६ अशी आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने भरवशाच्या पाथुम निसांकाला पहिल्याच चेंडूवर बाद केलं. निसांका बाद झाल्यामुळे श्रीलंकेची लयच हरपली आणि न्यूझीलंडने सामना जिंकला. हेन्रीने ४१ टी२० सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.
