इजिप्तमध्ये प्रत्येक शहरात स्क्वॉशपटूंसाठी अकादमी आहेत. तिथे मार्गदर्शनासाठी १०-२० प्रशिक्षक उपलब्ध असतात. सार्वजनिक स्क्वॉश कोर्ट्सची उपलब्धता प्रचंड आहे. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरदेखील विद्यार्थ्यांना सहजपणे स्क्वॉशची आवड जोपासता येते. या सगळ्यामुळेच इजिप्त स्क्वॉशचे सत्ताकेंद्र झाले आहे. अशा सुविधा आम्हाला मिळाल्या असत्या तर आपणही स्क्वॉशमध्ये इजिप्तप्रमाणे भरारी घेतली असती असे उद्गार आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेती स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकने काढले. पीएसए चॅलेंजर सर्किट स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर दीपिका बोलत होती. ऋत्विक भट्टाचार्य यांच्या प्रयत्नांमुळे भारतात या स्पर्धेचे आयोजन होते आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने देशातल्या स्क्वॉशपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळते आहे तसेच क्रमवारीचे गुणही मिळणार आहे. आम्ही खेळायला सुरुवात केली तेव्हा अशा स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला विदेशात जावे लागे. युवा खेळाडूंना घरच्या मैदानावरच ही संधी मिळते आहे. यंदाचे वर्ष माझ्यासाठी फलदायी ठरले असून, हाच फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न असेल.