पहिल्या दोन्ही कसोटीत पराभव पत्करावा लागला असला तरी उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही जोमाने पुनरागमन करू. प्रतिस्पध्र्याला सहजासहजी सामने जिंकू देणे, ही ऑस्ट्रेलियाची वृत्ती नाही. मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी पुढील सामन्यांत आम्ही भारताला कडवी लढत देणार आहोत, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने सांगितले.
‘‘मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आम्हाला पुढील दोन सामने जिंकावे लागणार आहेत. त्यावरच आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. पण सध्या फॉर्मात असलेल्या भारताला हरवणे सोपे नाही. पण एक सामना जरी आम्ही जिंकला तर चौथ्या सामन्यात विजय आमचाच होईल,’’ असे क्लार्क म्हणाला.
चेन्नई आणि हैदराबाद कसोटीतील पराभवामुळे क्लार्क व्यथित झाला आहे. तो म्हणतो, ‘‘पराभवासाठी कोणतीही सबब देता येणार नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाडय़ांवर आम्ही सुमार खेळ केला. आता आम्हाला सांघिक कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. पहिल्या दोन सामन्यांतील चुकांमधून आम्ही बरेच काही शिकलो आहोत.’