भक्कम बचाव, तंत्रशुद्ध फटके, स्लिपमधला भारताचा सर्वोत्तम फिल्डर आणि यष्टीरक्षक असे अनेक गुण अंगी असलेला राहुल द्रविड आजही अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींचा लाडका आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजाला नामोहरम करुन सोडणारा द्रविडचा खेळ चांगलाच गाजला. द वॉल हे बिरुद मिरवणाऱ्या द्रविडने काहीकाळासाठी भारतीय संघाचं कर्णधारपदही भूषवलं. राहुल द्रविडच्या कर्णधारपदाच्या काळातही भारतीय संघाची कामगिरी आश्वासक राहिलेली आहे. मात्र कर्णधार म्हणून द्रविडला कधीही म्हणावं तसं श्रेय दिलं जात नाही अशी खंत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने बोलून दाखवली.

द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००६-०७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्यात विजय मिळवला. याव्यतिरीक्त २००६ सालीही वेस्ट इंडिजला त्यांच्यात भूमीत कसोटी मालिकेत हरवण्यास राहुल द्रविडचा भारतीय संघ यशस्वी झाला होता. इंग्लंडला त्यांच्यात भूमीत पराभवाची चव चाखायला लावणारा राहुल द्रविड भारताचा तिसरा कर्णधार ठरला होता. २००७ साली त्याने हा कारनामा करुन दाखवला. याआधी अजित वाडेकर आणि कपिल देव यांनी अशी कामगिरी करुन दाखवली होती.

“सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली मी वन-डे संघात पदार्पण केलं. द्रविड कर्णधार असताना मी कसोटी संघात आलो. पण आपण कधीही द्रविडला कर्णधार म्हणून पुरेसं श्रेय दिलं नाही, हे दुर्दैवी आहे. आपण फक्त गांगुली, धोनी आणि आता विराट कोहलीबद्दल बोलतो. राहुल द्रविडही भारताचा यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. त्याची कामगिरी पाहिली की असं नेहमी लक्षात येतं की त्याला खेळाडू आणि कर्णधार म्हणून म्हणावं तसं श्रेय मिळालं नाही.” गंभीर Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर राहुल द्रविडने भारताच्या १९ वर्षाखालील संघाला प्रशिक्षण दिलं. सध्या द्रविड बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) चा संचालक म्हणून काम करतो.

अवश्य वाचा – धोनी नसता तर तेव्हाच संपलं असतं कोहलीचं करीअर – गौतम गंभीर