आठवडय़ाची मुलाखत : सैकोम मीराबाई चानू, भारताची वेटलिफ्टर

‘रिओ ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीनंतर जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मी सोनेरी कामगिरी करावी हे माझ्याप्रमाणेच आईवडिलांचेही स्वप्न होते. हे स्वप्न साकारल्याचा अभिमान वाटत आहे,’ असे भारताची वेटलिफ्टर सैकोम मीराबाई चानूने सांगितले. चानूने अमेरिकेत नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेतील ४८ किलो गटात सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी भारताची ती दुसरी खेळाडू आहे. यापूर्वी १९९४ व १९९५ मध्ये करनाम मल्लेश्वरीने सुवर्णपदक मिळविले होते. चानूने सुवर्णपदक मिळविताना राष्ट्रीय विक्रमही मोडला. आजपर्यंतच्या तिच्या वाटचालीबाबत तिच्याशी केलेली बातचीत.

* जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकाची खात्री होती काय?

रिओ ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीनंतर जागतिक स्पर्धेत चांगले यश मिळविण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी प्रशिक्षक विवेक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध सराव केला. त्याचप्रमाणे पूरक व्यायाम व आहार याबाबतही योग्य काळजी घेतली. दररोज सात ते आठ तास सराव केला. सरावातील कामगिरी लक्षात घेतल्यानंतर आपण सुवर्णपदक मिळवू शकतो याची मला खात्री झाली. फक्त मानसिक दडपण घेऊ नको असा सल्ला शर्मासरांनी मला दिला. त्यानुसार पूरक व्यायामात एकाग्रतेसाठीही प्राणायाम व योगावर भर दिला.

* या स्पर्धेसाठी तू बहिणीच्या विवाहाला अनुपस्थित राहिलीस. पालकांनी परवानगी कशी दिली?

जेव्हा मी एखाद्या स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी खात्री व्यक्त करते, तेव्हा माझ्यावर पालकांचाही विश्वास असतो. अमेरिकेत सुवर्णपदक जिंकणारच असा माझा आत्मविश्वास पाहून त्यांनी नाइलाजास्तव परवानगी दिली. अमेरिकेत गेल्यावर बहिणीच्या विवाहाला उपस्थित राहू शकत नाही याचे दु:ख होत होते. मात्र अव्वल यश मिळविण्यासाठी त्याग करण्याचे बाळकडू पालकांकडूनच मिळाले आहे. हे सुवर्णपदक मी माझ्या बहिणीलाच अर्पण केले आहे.

* मीराबाई हे तुला नाव कसे मिळाले?

माझ्या आईवडिलांची देवावर खूप श्रद्धा आहे. त्यातही आई ही मीराबाईंची भक्त असल्यामुळे माझे मीराबाई असे नामकरण करण्यात आले, असे ती नेहमी सांगते. मीराबाईंप्रमाणेच कोणत्याही गोष्टीवर एकनिष्ठ असावे व एकाग्रता दाखविली पाहिजे, असे ती सांगत असते. मी वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्द करताना या खेळाशी व मी नोकरी असलेल्या रेल्वे या आस्थापनेशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच मला चांगले यश मिळाले आहे.

* वेटलिफ्टिंगकरिता परदेशी प्रशिक्षकांची आवश्यकता आहे काय?

परदेशी प्रशिक्षक चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देत असले, तरी त्यांच्याबरोबर भारतीय खेळाडूंचा विशेषत: वेटलिफ्टर्सना सुसंवाद साधणे अडचणीचे जाते. तसेच अनेक वेळा भारतीय वेटलिफ्टर्सना परदेशी प्रशिक्षकांचा त्रास झाला आहे, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. मी जे यश मिळविले आहे, त्यामध्ये शर्मासरांचाच सिंहाचा वाटा आहे. अर्थात काही खेळांमध्ये परदेशी प्रशिक्षकांची मदत घेणे अपरिहार्य असते.

* वेटलिफ्टिंग व उत्तेजकाचे अतूट नाते असते. त्याबाबत काय मत आहे?

आमच्या खेळात यापूर्वी अनेक भारतीय खेळाडूंची कारकीर्द उत्तेजकामुळे उद्ध्वस्त झाले आहे. याची मला कल्पना आहे. माझे प्रशिक्षक, वैद्यकीय सल्लागार याबाबत खूप काळजी घेत असतात. झटपट यश मिळविण्याचा माझा मार्ग नाही. मी आता २३ वर्षांची आहे व मला ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहे. हे ओळखूनच मी उत्तेजकापासून कायमच दूर राहते.

*  पुढील वर्षी अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहेत. त्याबाबत काय नियोजन केले आहे?

राष्ट्रकुल क्रीडा व आशियाई क्रीडा स्पर्धासह अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये सोनेरी कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील. जागतिक विजेतेपद हा काही चमत्कार नाही हे मला दाखवायचे आहे. टोकियो येथे २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी या दोन्ही स्पर्धा रंगीत तालीमच असणार आहेत. त्या दृष्टीने आतापासूनच मी सरावाचे नियोजन केले आहे. आमच्या खेळात शारीरिक तंदुरुस्तीसही खूप महत्त्व आहे. माझ्यापुढे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मल्लेश्वरीचा आदर्श आहे. तिची वारसदार होण्याचे माझे ध्येय आहे.