बोगोटा (कोलंबिया) : भारताची ऑलिम्पिक पदकविजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने मनगटाच्या दुखापतीवर मात करत बुधवारी जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. मीराबाईने एकूण २०० किलोचे वजन उचलले. जागतिक स्पर्धेत सहभागी होताना मीराबाईचे मनगट दुखावले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत मीराबाईने स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली. टोक्यो ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या मीराबाईने ४९ किलो वजनी गटात सहभाग नोंदवला. तिने स्नॅचमध्ये ८७ किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात ११३ किलो असे एकूण २०० किलो वजन उचलत रौप्यकमाई केली. चीनच्या जिआंग हुईहुआने २०६ किलो (९३ व ११३) वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. चीनच्याच होऊ झीहुआने १९८ किलो (८९ व १०९ किलो) कांस्यपदक जिंकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘आम्हाला या स्पर्धेचे दडपण नव्हते. इतके वजन मीराबाई कायम उचलते. आता आगामी स्पर्धामध्ये आम्ही अधिक वजन उचलण्यास सुरुवात करू,’’ असे भारताचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी सांगितले. मीराबाईने २०१७च्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. यंदा तिच्याकडून सोनेरी कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात सरावादरम्यान मीराबाईचे मनगट दुखावले. याच दुखापतीसह ती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weightlifting championship mirabai wins silver despite wrist injury ysh
First published on: 08-12-2022 at 00:02 IST