चेन्नई येथे सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं संघात तीन बदल केले आहे. यामध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याशिवाय कुलदीप आणि अक्षर पटेल यांना वॉशिंगटन सुंदर आणि शाबाज नदीम यांच्याजागी संघात स्थान देण्यात आलं आहे.

रवींद्र जडेजाच्या जागी पहिल्या कसोटीतच अक्षर पटेल पदार्पण करणार हे निश्चित झाले होते, परंतु दुखापतीमुळे तो खेळू न शकल्यामुळे शाहबाज नदीमला संधी मिळाली होती. पंरतु अक्षर आता दुखापतीतून सावरून दुसऱ्या कसोटीत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. दुसरा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी अक्षर पटेल याला पदापर्णाची टोपी देत संघात स्वागत करण्यात आलं. कुलदीप यादवनं तब्बल दोन वर्षानंतर भारतीय संघात पदार्पण केलं आहे.

कसोटी गमावल्यास अंतिम फेरीचा मार्ग खंडित

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेल्या भारतासाठी दुसरा कसोटी सामना महत्त्वाचा ठरेल. हा सामना भारताने गमावल्यास अंतिम फेरीचे स्वप्न धुळीस मिळेल. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला इंग्लंडविरुद्धची मालिका २-१ किंवा ३-१ अशा फरकाने जिंकण्याची आवश्यकता आहे.

आणखी वाचा- IND vs ENG : कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण…. – पीटरसन

रोहित, रहाणेकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा

सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील रहाणे धावांसाठी झगडत आहेत. त्यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा केली जात आहे. पहिल्या कसोटीत रोहितने दोन डावांत अनुक्रमे ६ आणि १२ धावाच केल्या. रोहितने ऑस्ट्रेलियात तिसऱ्या कसोटीत २६ आणि ५२ धावा केल्या, तर चौथ्या कसोटीत ४४ आणि ७ धावा केल्या. रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १ आणि ० धावा करता आल्या. तसेच ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या कसोटीत २२ आणि ४ धावा, तर चौथ्या कसोटीत ३७ आणि २४ धावा केल्या.

आणखी वाचा- IND vs ENG : तब्बल दोन वर्षानंतर कुलदीपचं संघात पुनरागमन

भारतीय संघ –

शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव

इंग्लंडचा संघ –

जो रूट (कर्णधार), डॉमिनिक सिब्ली, रॉरी बर्न्‍स, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, बेन फोक्स (यष्टीरक्षक), मोईन अली,  स्टुअर्ट ब्रॉड, जॅक ली, ऑली स्टोन.