आपण बरेच वर्षे जे खेळलो, ज्यामध्ये रमलो, ज्याने आपल्याला अवीट आनंदासह समाधान, सुख पदरात टाकले त्या क्रिकेटला अलविदा करताना कुमार संगकाराचे डोळे डबडबले होते. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी त्याचे स्वागत माजी क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये केले. या प्रसंगी उपस्थित असलेल्या राष्ट्रपतींनी संगकाराला ग्रेट ब्रिटनच्या उच्च आयुक्तपदी नेमणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा तो आश्चर्यचकितच झाला.
भारताने अखेरचा बळी मिळवीत विजयावर शिक्कामोर्तब केले आणि हस्तांदोलन करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला. आपल्या देशाच्या नायकाला विजयाने निरोप देता न आल्याची बोच त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. अखेरच्या सामन्यात पराभवाचे शल्य फक्त मनात ठेवत, चेहऱ्यावर थोडेसे उसने स्मित करीत संगकारा मैदानात आला आणि त्याच्या नावाचा एकच जयघोष झाला. भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन केल्यावर मैदानात चेंडू देणाऱ्या मुलांवर त्याने छायाचित्र काढत त्यांना खूश केले, त्यांच्यासाठी तो आयुष्यभराचा ठेवाच होता.
सामन्याचा समारोप सोहळा आटोपला तरी कुणाचा पाय निघत नव्हता, कारण सारेच संगकाराला अलविदा करण्यासाठी आतुर होते. संगकाराने समारोपाचे भाषण करण्यासाठी माईक हातात घेतला तेव्हा सर्व ठिकाणी स्तब्धता होती. संगकारा भाषण करताना बराच भावुक झाला होता आणि त्याला ऐकणाऱ्या प्रत्येकाचे मन हेलावले. संगकाराच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. सर्वाना धन्यवाद म्हणत त्याने क्रिकेटला अलविदा केले आणि गावस्कर यांनी त्याचे माजी क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये स्वागत केले.
‘‘ तुझ्या आयुष्यातील हा पहिला डाव अद्भुत असाच होता, दुसरा डावही असाच चांगला होण्यासाठी शुभेच्छा. माजी क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये तुझे मनापासून स्वागत. श्रीलंकेच्या ड्रेसिंगरूममधला तू मोठा भाऊ होतास. तुझ्या बॅटवर चेंडू लागल्यावर येणारा श्रवणीय आवाज आम्ही कधीच विसरू शकत नाही. अपेक्षांचे ओझे कायम वावरत तू एवढी वर्षे दर्जेदार खेळ केलास, गेल्या दहा वर्षांमध्ये जे काही तू कमावलेस ते कधीच विसरता येणार नाही,’’ असे गावस्कर म्हणाले.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारताची जर्सी सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरीनिशी संगकाराला भेट दिली. या वेळी दोघांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मैदानात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले हे दोघे या क्षणी चांगल्या मित्रांसारखे हास्यविनोद करताना दिसले.