‘चेंडू रिव्हर्स स्विंग झाला आणि डॅरेल मिचेलला लागला. त्याला सॉरी म्हणण्यासाठी गेलो होतो’, असं सांगत युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने चाहत्यांची मनं जिंकली.
टी२० वर्ल्डकप फायनलदरम्यान अर्शदीप सिंगने फॉलोथ्रूमध्ये असताना स्टंप्सना लक्ष्य करत चेंडू फेकला. मात्र तो डॅरेल मिचेलला लागला. मिचेलने याविषयी नाराजी व्यक्त केली आणि त्याने अर्शदीपला सुनावलं. भारत आणि न्यूझीलंडचे सामने नेहमीच चांगल्या खेळभावनेमध्ये खेळले जातात. या घटनेनंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मिचेलचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याचवेळी अनुभवी पंच रिचर्ड एलिंगवर्थ यांनी मध्यस्थी करत अर्शदीपशी संवाद साधला. अर्शदीपने लगेचच मिचेलशी हस्तांदोलन केलं आणि या प्रकरणावर पडदा टाकला. टी२० वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरल्यानंतर अर्शदीपने तातडीने मिचेलला गाठत त्याची माफी मागितली.
‘आता अतिशय भारी वाटत आहे. २-३ दिवसात विश्वविजेतेपद झाल्याची भावना मनात रुजेल. हा अतिशय दर्जेदार दमदार संघ आहे. सगळे एकमेकांना साथ देतात, पूरक कामगिरी करतात. प्रत्येक सामन्यात वेगवेगळे मॅचविनर्स खेळाडू समोर आले आहेत. विश्वविजेतेपद हा सर्वोत्तम आनंदाचा क्षण आहे. प्रथम गोलंदाजी मिळाली असती तर प्रतिस्पर्धी संघाला दोनशेच्या आसपास रोखणं हे आमचं काम असतं. आज २५० धावांचा बचाव करायचा होता. आम्ही सगळ्यांनी शिस्तबद्ध मारा करत न्यूझीलंडला रोखलं’, असं अर्शदीपने सांगितलं.
स्वत:चा युट्यूब चॅनल असणाऱ्या अर्शदीपला समालोचक हर्षा भोगले यांनी कंटेटविषयी विचारलं. त्यावर अर्शदीप म्हणाला, ‘१५-२० रील्स डोक्यात आहेत. आता फोन ताब्यात मिळेल. एकेक करून रील्स करेन’.
