WI beat IND by 5 wickets in 3RD ODI: वेस्ट इंडिज संघाने भारताचा तिसऱ्या वनडे सामन्यात ५ विकेट्सने पराभव केला आहे. विडिंजचा कर्णधार भारताच्या गोलंदाजांवर चांगलाच भारी पडला. भारताने दिलेल्या ३५३ धावांच्या विक्रमी लक्षाचा यशस्वी पाठलाग करत तीन सामन्यांच्या मालिकेतील एक सामना वेस्ट इंडिजने आपल्या नावे केला आहे. वेस्ट इंडिजने त्यांच्या वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत हा विक्रमी विजय साकारला आहे.

विडिंज संघाचा कर्णधार शे होपने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. शे होपला संघाच्या इतर फलंदाजांनी कमालीची साथ दिली. भारताने सुरूवातीचे दोन्ही वनडे सामने जिंकत मालिका आपल्या नावे केली असली तरी तिसरा वनडे सामना जिंकत वेस्ट इंडिजने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. यासह तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी राहिली.

भारताने दिलेल्या ३५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने विकेट घेत जॉन कॅम्पबेलला माघारी पाठवलं. तर शे होपने मात्र अखेरपर्यंत संघासाठी खिंड लढवली. शे होपला क्रॅम्प्स येत असतानाही तो अखेरपर्यंत संघासाठी मैदानावर खेळत राहिला. शे होपशिवाय अमीर जांगूने ६७ धावांची खेळी केली आणि धावबाद जाला. याशिवाय रूदरफोर्डने २४ धावा व किम पॉलने ४४ धावांचं योगदान दिलं. शे होप मात्र भारतीय गोलंदाजांवर एकटाच भारी पडला आणि अखेरीस संघाला विजय मिळवून देत माघारी परतला. शे होपने या सामन्यात १४३ चेंडूत १७ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १६२ धावांची खेळी केली.

भारताने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारताची सुरूवात मात्र खूपच खराब झाली. तिसऱ्याच षटकात शुबमन गिल एक धावेवर तर विराट कोहली गोल्डन डकवर क्लीन बोल्ड झाला. यामुळे भारताची सुरूवात खूप खराब झाली. त्यानंतर रोहित शर्मा व ऋतुराज गायकवाड यांनी १३७ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. भारताची गाडी पुन्हा रूळावर आणणाऱ्या रोहित शर्माचं शतक मात्र हुकलं. रोहित ८५ चेंडूत १० चौकार ३ षटकारांसह ९२ धावा करत बाद झाला. तर ऋतुराज गायकवाडने ५७ धावांची खेळी केली.

रोहित-ऋतुराज बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या केएल राहुलने उत्कृष्ट खेळी साकारली. राहुलने ८७ चेंडूत १० चौकार व ३ षटाकारांसह १२९ धावा केल्या. तर नमन धीरने ३० धावा करत त्याला चांगली साथ दिली. तर पदार्पणवीर अंशुल कंबोजने दोन षटकारांसह महत्त्वपूर्ण १७ धावा केल्या. यासह भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५२ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जेडन सील्सने ३ विकेट्स घेत शानदार गोलंदाजी केली. तर किमो पॉलने २ व गुडाकेश मोतीने १ विकेट घेतली.