गुणवत्ता, कौशल्य, क्षमता, पुनरागमनाची अचाट ताकद, ऊर्जा या सगळ्या बाबतीत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये कमालीचे साधम्र्य आहे. मात्र सातत्य या गोष्टीचे दोन्ही संघांना वावडे आहे, परंतु  ऑस्ट्रेलियाला नमवत मिळालेल्या आत्मविश्वासाला सातत्याची जोड देत वेस्ट इंडिजने ‘करो या मरो’ लढतीत पाकिस्तानवर ८४ धावांनी विजय मिळवत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. आता गुरुवारी वेस्ट इंडिजसमोर श्रीलंकेचे आव्हान असणार आहे.
नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात डळमळीत झाली. स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध ख्रिस गेल केवळ ५ धावा करून तंबूत परतला. ड्वेन स्मिथही ८ धावांवर बाद झाला. मात्र लेंडल सिमन्स आणि मार्लन सॅम्युअल्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र स्थिरावलेत असे वाटत असतानाच दोघेही ठरावीक अंतराने बाद झाले. सिमन्सने ३१, तर सॅम्युअल्सने २० धावा केल्या. त्यापाठोपाठ दिनेश रामदीनही माघारी परतला. ५ बाद ८१ अशा अवस्था झालेल्या वेस्ट इंडिजच्या डावाला आधार दिला तो कर्णधार डॅरेन सॅमी आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो जोडीने. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी केवळ ५.२ षटकांत ७१ धावांची लयलूट केली. सईद अजमल या ट्वेन्टी-२० प्रकारातील सगळ्यात धोकादायक गोलंदाजावर जोरदार आक्रमण केले. या दोघांच्या तुफानी भागीदारीमुळेच वेस्ट इंडिजने दीडशेचा टप्पा ओलांडला. ब्राव्होने २६ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४६ धावा केल्या. सॅमीने २० चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४२ धावांची खेळी केली. पाकिस्तानतर्फे हफीझ, तन्वीर, बाबर आणि आफ्रिदी यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना क्रिश्मर सँटोकीच्या पहिल्याच चेंडूवर मागच्या सामन्यात शतक झळकावणारा अहमद शेहझाद बाद झाला. शेहझादनंतर ठरावीक अंतराने पाकिस्तानच्या फलंदाजांनी आपल्या विकेट गमावल्या. कोणत्याही क्षणी लक्ष्य गाठण्यासाठी खेळताहेत असे दिसून आले नाही. पाकिस्तानच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली.
सुनील नरिन, सॅम्युअल बद्री यांच्या फिरकीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. आंद्रे रसेल आणि क्रिश्मर सँटोकी यांनी भेदक मारा करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना निष्प्रभ केले. पाकिस्तानचा डाव ८२ धावांतच संपुष्टात आला. सुनील नरिन आणि सॅम्युअल बद्रीने प्रत्येकी ३ बळी घेतले. ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या ड्वेन ब्राव्होला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात
आले.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : २० षटकांत ६ बाद १६६ (ड्वेन ब्राव्हो ४६, डॅरेन सॅमी ४२, लेंडल सिमन्स ३१; मोहम्मद हफीझ १/१५) विजयी विरुद्ध पाकिस्तान : १७.५ षटकांत सर्वबाद (मोहम्मद हफीझ १९, सोहेब मकसूद १८, शाहिद आफ्रिदी १८; सॅम्युअल बद्री ३/१०, सुनील नरिन ३/१६)
सामनावीर : ड्वेन ब्राव्हो