West Indies vs Scotland Highlights: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. वेस्ट इंडिजकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना शिमरोन हेटमायरने दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने ५ गडी बाद १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला, पण वेस्ट इंडिजने हा सामना ३५ धावांनी आपल्या नावावर करून विजयाजं खातं उघडलं.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. सलामीला आलेल्या ब्रेंडन किंग आणि कर्णधार शे होपने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. यादरम्यान ब्रेंडन किंगने ३५ धावांचे योगदान दिले. तर शे होपने १९ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शिमरोन हेटमायरने फलंदाजीत कमाल केली. त्याने ३६ चेंडूंचा सामना करत २ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने ६४ धावांची खेळी केली. तर रोमन पॉवेलने २४ धावांची खेळी केली. शेवटी शेरफेन रुदरफोर्डने १३ चेंडूत २६ धावा चोपल्या.या दमदार खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने २० षटकांअखेर ५ गडी बाद १८२ धावा केल्या.
स्कॉटलंडला या स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी १८३ धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या स्कॉटलंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीवीर फलंदाज मायकल जोन्स ५ चेंडूत १ धाव करून माघारी परतला. तर जॉर्ज मुंसीने १५ चेंडूत अवघ्या १९ धावा केल्या. स्कॉटलंडला हवी तशी सुरूवात मिळू शकली नाही. त्यानंतर ब्रेंडन मॅक्मुलेन अवघ्या १४ धावा करून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रिची बेरिंगटन आणि टॉम ब्रुसने मिळून स्कॉटलंड संघाचा डाव सांभाळला. रिची बेरिंगटन ४२ धावा करून माघारी परतला. तर इतर फलंदाजांनाही हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे स्कॉटलंडला हा सामना थोडक्यात गमवावा लागला आहे.
रोमारियो शेफर्डची हॅट्रिक
या सामन्यातील १७ वे षटक वेस्ट इंडिजसाठी टर्निंग पॉईंट ठरले. या षटकात गोलंदाजी करताना शेफर्डने हॅट्रिक पूर्ण केली. त्यानंतर १ चेंडू शिल्लक ठेवून पुढच्याच चेंडूवर आणखी एक विकेट घेतला. यासह एकाच षटकात त्याने ४ विकेट्स घेतल्या. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले.
