Alzarri Joseph accuses West Indies coach Daren Sammy of lying: सध्या वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. पाकिस्तानचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघांमध्ये खेळवल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान संघाने विजय मिळवला. तर आता दुसरा सामना २ ऑगस्टपासून खेळवला जाईल. यापूर्वी वेस्ट इंडिज क्रिकेट संघामध्ये मोठा वाद पेटला आहे. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने प्रशिक्षक डॅरेन सॅमीवर आरोप केला आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याने वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांच्यावर गंभीर आरोप केला असून, सॅमी आपल्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवत असल्याचा दावा त्याने केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात जोसेफचा समावेश करण्यात आला नव्हता; सॅमीच्या मते जोसेफनेच निवडीसाठी नकार दिला होता, मात्र जोसेफचं म्हणणं आहे की वैयक्तिक कारणांमुळे तो खेळू शकत नाही आणि सॅमी याबद्दल खोटी माहिती पसरवत आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी खुलासा केला की, दोन सामन्यांच्या या मालिकेसाठी अल्झारी जोसेफची निवड करण्यात आली होती, परंतु या वेगवान गोलंदाजाने स्वतःहूनच संघात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. जोसेफचा हा निर्णय आपल्या नियंत्रणाबाहेरचा होता, असंही सॅमीने नमूद केलं. तसेच, करारांतर्गत असलेल्या खेळाडूंनी निवडीस नकार देण्याच्या यो गोष्टीकडे ‘क्रिकेट वेस्ट इंडिज’च्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणं आवश्यक असल्याचेही सॅमीने सुचवलं.
अल्झारी जोसेफने डॅरेन सॅमीच्या विधानाला आता प्रत्युत्तर दिलं आहे. त्याने स्पष्ट केलं की, कसोटी मालिका खेळण्यासाठी तो पुरेसा फिट नव्हता आणि या परिस्थितीबद्दल त्याने प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांना आधीच कल्पना दिली होती. जोसेफने सांगितलं की, “मी मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. CWI ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ‘वैयक्तिक कारणांमुळे’ मी उपलब्ध नसल्याचं म्हटलं होतं. डॅरेन सॅमी अनेक वर्षांपासून क्रिकेटमध्ये आहेत, त्यामुळे त्या निवेदनाचा काय परिणाम होईल आणि त्यातून लोकांमध्ये कोणता संदेश जाईल, याची त्यांना पूर्ण कल्पना होती.”
“खरं सांगायचं तर, सॅमी यांच्या वक्तव्यावर मला आणखी काही बोलायचं नाही. त्यांनी जे म्हटलं, त्यातून लोकांमध्ये कोणती चर्चा रंगेल, याची त्यांना पूर्ण जाणीव होती,” असं जोसेफने अँटिग्वा ऑब्झर्व्हरच्या ‘गुड मॉर्निंग जोजो स्पोर्ट्स शो’मध्ये सांगितलं.
“मी जवळपास संपूर्ण वर्षभर मैदानाबाहेर होतो. दुसऱ्यांदा स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्यानंतर बराच काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलो नव्हतो. त्यामुळे मी दोन कसोटी सामने खेळल्यानंतर आणि त्याआधी न्यूझीलंडविरुद्ध सलग पाच वनडे सामने खेळल्यानंतर माझ्या फिटनेसबाबत मुख्य प्रशिक्षकांशी चर्चा झाली होती. मला स्वतःलाच जाणवत होतं की, माझं शरीर लगेच आणखी एका कसोटी मालिकेसाठी तयार नाही. त्यामुळे माझ्या निर्णयामागचा संदर्भ न सांगता करण्यात आलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं,” असं जोसेफने स्पष्ट केलं.
यासोबतच डॅरेन सॅमी यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांबाबतही जोसेफने स्पष्ट भूमिका मांडली. “मी डॅरेन सॅमी यांचं प्रतिनिधित्व करत नाही, मी देशाचं प्रतिनिधीत्त्व करण्यासाठी मैदानात उतरतो, त्यामुळे आमच्यातील वैयक्तिक नात्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही. मी तिथे मैत्री करण्यासाठी जात नाही. मी माझं काम करण्यासाठी आणि वेस्ट इंडिजच्या जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरतो,” अशा शब्दांत जोसेफने उत्तर दिलं.
