विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजच्या ‘चॅम्पियन’ खेळाडूची निवृत्तीची घोषणा; शनिवारी खेळणार शेवटचा सामना

श्रीलंकेच्या टी २० विश्वचषकातील चार सामन्यांतील तिसऱ्या पराभवामुळे वेस्ट इंडिजच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत

West indies Dwayne bravo retirement international cricket after t20 world cup 2021
(फोटो सौजन्य – Reuters)

वेस्ट इंडिजच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या ड्वेन ब्राव्होने गुरुवारी टी २० विश्वचषकात श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर निवृत्तीची घोषणा केली. शनिवारी ड्वेन ब्राव्हो त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. श्रीलंकेच्या टी २० विश्वचषकातील चार सामन्यांतील तिसऱ्या पराभवामुळे वेस्ट इंडिजच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आता गट एकमधून अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत आहेत, तर इंग्लंडने आधीच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

“मला वाटतं निवृत्तीची वेळ आली आहे. माझी कारकीर्द उत्तम राहिली आहे. १८ वर्षे वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करताना मी अनेक चढउतार पाहिले आहेत. माझ्या संघाचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि कॅरेबियन लोकांनी माझ्यावर इतके दिवस जे प्रेम केले ते अप्रतिम आहे,” असे ब्राव्हो म्हणाला.

 “व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे भविष्य आहे असे मला वाटते. आम्हाला फक्त युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याची गरज आहे. क्रिकेटमध्ये छाप पाडणे कठीण आहे. मी माझ्या ७०, ८० आणि ९० च्या दशकातील महान खेळाडूंचा आभारी आहे, ज्यांनी मला खेळताना पाहून मला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली,” असे ब्राव्हो म्हणाला.

ब्राव्हो २०१२ आणि २०१६ मध्ये टी २० विश्वचषक जिंकणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन टीमचा भाग आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी आतापर्यंत एकूण ९० टी-२० सामने खेळले असून १२४५ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ७८ विकेट्सही घेतल्या आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात ब्राव्होला विशेष खेळ करता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत तीन बाद १८९ धावा केल्या. ड्वेन ब्राव्होने चार षटकांत ४२ धावा केल्या आणि त्याला केवळ पठुन निसांकाची विकेट मिळाली. ड्वेन ब्राव्हो तीन चेंडूत दोन धावा करून वानिंदू हसरंगाच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. शिमरॉन हेटमायरने संघासाठी ५४ चेंडूत ८१ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. मात्र विजयासाठी त्याची खेळी पुरेशी ठरली नाही. दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडिजचा संघ स्पर्धेतून बाद झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: West indies dwayne bravo retirement international cricket after t20 world cup 2021 abn

Next Story
सर्वसामान्य चाहत्यांसाठी फक्त सहा हजार तिकिटे
ताज्या बातम्या