वृत्तसंस्था, नवी दिल्ली : वेस्ट इंडिज क्रिकेटची अधोगती सुरूच राहिली असून सलग तिसर्यांदा त्यांना एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवण्यात अपयश आले आहे. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध सलग दोन सामन्यांत विजय मिळवले आणि २०२७च्या विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवली. या निकालांचा विंडीजला मोठा फटका बसला असून, त्यांचे थेट पात्रतेचे स्वप्न भंगले आहे.
दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे संयुक्तपणे होणार्या २०२७च्या विश्वचषकासाठी यजमान देश वगळता ‘आयसीसी’ क्रमवारीतील अव्वल आठ पूर्ण सदस्य संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका हा अव्वल आठमध्ये असलेला यजमान संघ आहे. त्यामुळे क्रमवारीतील नवव्या स्थानावरील संघालाही थेट पात्रतेची संधी मिळणार आहे. सध्या बांगलादेश नवव्या, वेस्ट इंडिज दहाव्या आणि झिम्बाब्वे ११व्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडिजला नवव्या स्थानावर पोहोचण्यासाठी आयर्लंडने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका ५-० किंवा ४-१ अशी जिंकणे आवश्यक होते. मग भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजला २-० असा विजय मिळवावा लागणार होता. मात्र, आयर्लंड-अफगाणिस्तान मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसर्या सामन्यात अफगाणिस्तानने आयर्लंडवर ९२ धावांनी, तर तिसर्या सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे वेस्ट इंडिजला आवश्यक असलेले समीकरण पूर्ण होणे शक्य नाही, तर अफगाणिस्तानची पात्रता सिद्ध झाली.
सलग तिसर्यांदा अपयश
वेस्ट इंडिजला २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळाली नव्हती. परंतु पात्रता स्पर्धेत त्यांनी दमदार कामगिरी करत मुख्य स्पर्धेत स्थान मिळवले होते. २०२३ मध्येही त्यांना थेट पात्रता मिळवता आली नाही. त्यानंतर पात्रता फेरीतही त्यांची कामगिरी निराशाजनक ठरली आणि विश्वचषक इतिहासात प्रथमच वेस्ट इंडिजला मुख्य स्पर्धेबाहेर राहावे लागले. आता विंडीजचा संघ थेट पात्र ठरला नसून त्यांना पुन्हा पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.
