एकेकाळी प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या वेगवान गोलंदाजांचा संघ यासाठी प्रसिद्ध वेस्ट इंडिजने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर गुदकेश मोटी, रॉस्टन चेस आणि अकेल हुसेन या फिरकीपटूंच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला. शेरफन रुदरफोर्डच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने १९६ धावांची मजल मारली. वेस्ट इंडिजच्या फिरकीसमोर नामोहरम झालेल्या इंग्लंडने १६६ धावा केल्या.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्टने इंग्लंडच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण केलं. १४ चेंडूत ३० धावांची खेळी करून सॉल्ट तंबूत परतला. बटलरकडून इंग्लंडला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र चेसच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा बटलरचा प्रयत्न रोव्हमन पॉवेलच्या हातात जाऊन विसावला. गुदकेश मोटीने टॉम बँटनला झटपट माघारी परतावलं. तो दोनच धावा करू शकला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या जेकब बेथेलला मोटीनेच त्रिफळाचीत केलं. त्याने ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. १० षटकांमध्ये इंग्लंडला १०४ धावांची आवश्यकता होती आणि धावगतीचं आव्हान दहापल्याड गेलं होतं.

कर्णधार हॅरी ब्रूक आणि सॅम करन यांनी पडझड रोखली. धावगतीचं आव्हान वाढत असताना मोटीने ब्रूकला बाद केलं. मोटीने स्वत:च्या गोलंदाजीवर त्याचा उत्तम झेल टिपला. त्याने १७ धावा केल्या. रॉस्टन चेसने शेवटच्या षटकात विल जॅक्सला बाद करत इंग्लंडला आणखी अडचणीत टाकलं. अकेल हुसेनने शेवटच्या षटकात ओव्हर्टनला बाद केलं. त्याने ५ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंनी अतिशय शिस्तबद्ध आणि हुशारीने मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना चकवलं. जेसन होल्डरने जोफ्रा आर्चरला धावचीत केलं.

मोटीने ३३ धावांत ३ तर चेसने २९ धावांत इंग्लंडच्या २ फलंदाजांना तंबूत परतावलं. इंग्लंडने १६६ धावा केल्या.

इंग्लंडने वानखेडे स्टेडियमवर दव पडेल या अंदाजाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होप तंबूत परतला. जोफ्रा आर्चरने त्याला बाद केलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही. पाठोपाठ ब्रँडन किंगही बाद झाला. शिमोरन हेटमायर आणि रॉस्टन चेस यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी करत डाव सावरला. जेमी ओव्हर्टनने हेटमायरला बाद करत ही जोडी फोडली. त्याने २३ धावा केल्या. चेसला शेरफन रुदरफोर्डची साथ मिळाली. रशीदने चेसला पायचीत करत ही जोडी फोडली. चेसने ३४ धावा केल्या. चेस बाद झाल्यानंतर रुदरफोर्डने सूत्रं हाती घेतली. रुदरफोर्ड आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. इथल्या खेळपट्टीचा, वातावरणाचा अभ्यास असणाऱ्या रुदरफोर्डने एकेरी, दुहेरी धावा आणि चौकार, षटकार यांची सुरेख सांगड घातली. रुदरफोर्ड आणि रोव्हमन पॉवेल यांनी चौथ्या विकेटसाठी २९ चेंडूत ५१ धावांची भागीदारी केली.

पॉवेल बाद होताच, रुदरफोर्डला अनुभवी जेसन होल्डरची साथ मिळाली. या दोघांनी ३२ चेंडूत ६१ धावांची खणखणीत भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर वेस्ट इंडिजने पावणेदोनशेचा टप्पा ओलांडला. भागीदारीदरम्यान रुदरफोर्डने अर्धशतकाला गवसणी घातली. रुदरफोर्डने सूत्रधाराची भूमिका निभावत ४२ चेंडूत २ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ७६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. होल्डरने १७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३३ धावा केल्या. इंग्लंडतर्फे आदिल रशीदने अवघ्या १६ धावा देत २ विकेट्स पटकावल्या. सलामीच्या लढतीत रशीदच्या गोलंदाजीवर नेपाळच्या फलंदाजांनी ४२ धावा चोपून काढल्या. रशीदला विकेटही मिळाली नव्हती. त्या सामन्यातील चुकांमधून बोध घेत रशीदने शिस्तबद्ध मारा केला. रशीदला अन्य फिरकीपटू विल जॅक्स आणि लायम डॉसन यांची साथ मिळू शकली नाही. इंग्लंडला जोफ्रा आर्चरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी त्यालाच लक्ष्य करत ४८ धावा कुटल्या.

गतविजेत्यांमधली तुल्यबळ लढत
इंग्लंडने २०१० आणि २०२२ मध्ये टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला आहे. वेस्ट इंडिजने २०१२ आणि २०१६ मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. दोन गतविजेत्या संघांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळाली.