विंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने दीड शतकी खेळी करत आपला फॉर्म पुन्हा एकदा सिद्ध केला. या खेळीदरम्यान विराटने सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद 10 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम मोडीत काढला. सचिनने २५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. मात्र विराटने केवळ २०५ डावांमध्ये हा पराक्रम केला. पहिल्या सामन्यातील १४० धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीच्या नावावर २१२ एकदिवसीय सामन्यात २०४ डावांत ९९१९ धावा जमा झाल्या होत्या. त्यानंतर आज ८१ धावांची भर घालून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

विराटच्या खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला विजयासाठी 322 धावांचं आव्हान दिलं. पहिल्या डावातील या खेळीदरम्यान विराटने तब्ब्ल 20 विक्रम मोडीत काढले.

1 – घरच्या मैदानावर सर्वात जलद 4 हजार धावा पूर्ण करणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी एबी डिव्हीलियर्सच्या नावावर हा विक्रम जमा होता, त्याने 91 डावांमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराटने 78 डावांमध्ये ही कामगिरी केली.

1 – विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. सचिनने विंडीजविरोधात 1573 धावा केल्या आहेत, आता हा विक्रम विराटच्या नावार जमा झाला आहे.

1 – सर्वात जलद 10 हजार धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर जमा. याआधी सचिन तेंडुलकरने 259 डावांमध्ये ही कामगिरी केली होती, विराटने 205 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

1 – दहा हजार धावांचा टप्पा ओलांडायला विराट कोहलीने 10 वर्ष आणि 68 दिवस घेतले. कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेली ही सर्वात जलद कामगिरी ठरली आहे. याआधी राहुल द्रविडने 10 वर्ष 317 दिवसांमध्ये 10 हजार धावा केल्या होत्या.

1 – सर्वात कमी चेंडूंचा सामना करत 10 हजार धावा पूर्ण करणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी करण्यासाठी 10 हजार 813 चेंडू घेतले.

1 – कोणत्याही दोन प्रतिस्पर्धी संघांविरोधात सलग 3 डावांमध्ये शतक झळकावणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे. (श्रीलंका व विंडीजविरोधात विराटने ही कामगिरी केली आहे)

1 – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने सर्वात जलद 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट पहिला कर्णधार ठरला आहे. 137 डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली आहे.

1 – एका कॅलेंडर वर्षात सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर. विराटने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचा विक्रम मोडीत काढला.

950 – भारत आज आपला 950 वा वन-डे सामना खेळतो आहे.

2 – सचिन तेंडुलकरनंतर वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट दुसरा तरुण खेळाडू ठरला आहे. सचिनने वयाच्या 27 व्या वर्षी ही कामगिरी केली होती, तर विराटने वयाच्या 29 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.

2 – पाकिस्तानच्या बाबर आझमनंतर विराट कोहली विंडीजविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये सलग 3 शतकं झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

2 – वन-डे क्रिकेटमध्ये दोन दीड शतकं झळकावणारा विराट कोहली दुसरा कर्णधार ठरला आहे. याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रू स्ट्रॉसने अशी कामगिरी केली आहे.

3 – सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांच्यानंतर भारतात वन-डे क्रिकेटमध्ये 4 हजार धावा करणारा विराट तिसरा फलंदाज ठरला आहे.

4 – फलंदाज या नात्याने विराट कोहलीचं वन-डे क्रिकेटमधलं हे चौथ दीड शतक ठरलं आहे. रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंनी विराटपेक्षा जास्त दीड शतकं नोंदवली आहेत.

5 – विशाखापट्टणमच्या मैदानात 50 पेक्षा जास्त धावा करण्याची विराट कोहलीची ही पाचवी वेळ ठरली आहे.

5 – एकाच वर्षात कसोटी व वन-डे क्रिकेटमध्ये 1 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट पाचवा कर्णधार ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटींग, अँजलो मॅथ्यूज, स्टिव्ह स्मिथ यांनी अशी कामगिरी केली आहे.

6 – एका कॅलेंडर वर्षात हजार धावा करण्याची विराट कोहलीची ही सहावी वेळ ठरली आहे. सचिन तेंडुलकरने विराटपेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी केली आहे.

6 – वेस्ट इंडिजविरोधात विराट कोहलीचं हे सहावं शतक ठरलं. विराटने हाशिम आमला, एबी डिव्हीलियर्स आणि हर्षल गिब्स यांचा पाच शतकांचा विक्रम मोडीत काढला.

9 – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट नववा कर्णधार ठरला आहे.

13 – दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट तेरावा फलंदाज ठरला आहे.