इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने संथ खेळ करत दिवसअखेर ५ बाद १८८ धावांची मजल मारली. अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ७० षटकेच खेळविण्यात आला. मार्लोन सॅम्युअल्स (९४) आणि दिनेश रामदिन (६) खेळत आहेत.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने यजमानांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. तिसऱ्याच षटकात जेम्स अँडरसनने वेस्ट इंडिजचा सलामीवर क्रेग ब्रॅथवेटला त्रिफळाचीत केले. त्यापाठोपाठ डेवॉन स्मिथ (१५), डॅरेन ब्रावो (३५) व शिवनारायण चंदरपॉल (१) हे स्वस्तात बाद झाल्याने वेस्ट इंडिजची अवस्था ४ बाद ७४ अशी झाली होती. मात्र, सॅम्युअल्सने एका बाजूने खेळपट्टीवर तग धरला आणि जेरमीन ब्लॅकवूडसह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ब्लॅकवूड (२६) माघारी परतल्यानंतर सॅम्युअल्सने सूत्रे हातात घेत संघाला १८८ धावांचा पल्ला गाठून दिला. अंधुक प्रकाशामुळे हा सामना ७०व्या षटकांत थांबविण्यात आला. सॅम्युअल्स १८६ चेंडूंत १३ चौकार लगावून ९४ धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज (पहिला डाव) :  ७० षटकांत ५ बाद १८८ (डॅरेन ब्रावो ३५, मार्लोन सॅम्युअल्स नाबाद ९४, जेरमिन ब्लॅकवूड २६; ख्रिस जॉर्डन २/४०)