पाकिस्तान दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज महिला संघ घोषित करण्यात आला आहे. पाकिस्तान दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप पात्रता फेरीसाठी १५ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. तीन खेळाडू राखीव असून ते संघासोबत असणार आहेत. वेस्ट इंडिज संघात शेमेन कँपबेलचं पुनरागमन झालं आहे. दुखापतग्रस्त असल्याने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत खेळली नव्हती. मात्र एका सराव सामन्यातील कामगिरी पाहता निवडकर्ते आणि प्रशिक्षकांनी तिची निवड केली आहे. तिने १०७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शतकी खेळी होती. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत न खेळणाऱ्या कर्णधार स्टेफनी टेलरचंही संघात पुनरागमन झालं आहे.

“आगामी पाकिस्तान दौरा आणि वर्ल्डकपसाठी आमची निवड महत्त्वपूर्ण आहे. संघ २०२२ मध्ये क्रिकेट विश्वचषकात भाग घेण्याच्या दृष्टीने निवडला आहे. कँपबेल तंदुरूस्त असून संघात खेळणार आहे. ती संघातील वरिष्ठ खेळाडू असून यष्टीरक्षक आहे. तिने सराव सामन्यात चांगल्या धावा केल्या आहेत.”, असं मुख्य निवडकर्ते एन ब्राउन-जॉन यांनी सांगितलं आहे.

वेस्ट इंडिज महिला संघ १ नोव्हेंबरला पाकिस्तानात जाणार आहे. तिथे ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. सर्व सामने कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळले जातील. त्यानंतर संघ झिम्बाब्वेला रवाना होणार आहे. तिथे २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत असणाऱ्या वर्ल्डकप पात्रता सामन्यात भाग घेईल.

वेस्ट इंडिज महिला संघ
स्टेफनी टेलर (कर्णधार), अनिसा मोहम्मद, आलिया एलन, शेमेन कँपबेल, शामिलिया कनल, डियांड्रा डॉटिन, शेनेट ग्रिममंड, शिनेल हेनरी, कियाना जोसेफ, किसीया नाइट, किशोना नाइट, हेली मॅथ्यूज, शीडिन नेशन, शकीरा सेलमन, रशदा विलियम्स