Reasons Behind Team India Defeat, IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये पार पडला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १७ धावांनी विजय मिळवला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३५९ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटकात हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि दमदार विजयाची नोंद केली. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली. दरम्यान इतकं मोठं आव्हाने देऊनही भारतीय संघाचा पराभव कसा झाला? काय आहे पराभवाचं नेमकं कारण? जाणून घ्या.
भारतीय संघाची दमदार सुरूवात
या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघाला पुन्हा एकदा पहिल्या डावात फलंदाजीसाठी याव लागलं. पहिल्या डावात फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावा जोडल्या. यादरम्यान ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक १०५ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने १०२ धावा केल्या. या दोघांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३५८ धावांपर्यंत मजल मारली.
वॉशिंग्टन सुंदरचा फ्लॉप शो
विराट आणि ऋतुराज गायकवाड बाद होऊन माघारी परतल्यानंतर, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली आणि भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. दमदार सुरूवात मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की, भारतीय संघ ३८० धावापर्यंत पोहोचू शकतो. पण त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर ८ चेंडू खेळून १ धाव करत माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघाला ३५८ धावांवर समाधान मानावं लागलं. गोलंदाजी करतानाही त्याला एकही गडी बाद करता आला नाही. धावांचा पाठलाग करत असताना कर्णधार तेंबा बावूमा आणि एडेन मारक्रमने मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. मारक्रमने दमदार शतकी खेळी केली. पण शतक झळकावण्याआधीच त्याला झेलबाद करण्याची संधी चालून आली होती. पण सीमारेषेवर यशस्वीकडून सोपा झेल सुटला. त्यामुळे त्याला जीवदान मिळालं.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने १० षटकात ५४ धावा खर्च केल्या आणि २ गडी बाद केले. यादरम्यान त्याने ५.४० च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या. तर हर्षित राणाने ७ च्या इकोनॉमीने धावा खर्च करत १० षटकात ७० धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने १ गडी बाद केला. दरम्यान प्रसिध कृष्णा भारतीय संघाकडून सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने या डावात गोलंदाजी करताना ८.२ षटकात ८५ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने १०.२० च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या.
