Shubman Gill Temple AI Device Auckland Practice: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या वनडे मालिकेसाठी भारताचे खेळाडू ऑकलंडमध्ये सराव करताना दिसत आहेत. या सरावादरम्यान शुबमन गिलने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शुबमन गिल कपाळाला एक छोटसं उपकरण सरावादरम्यान लावून उतरला होता. हे उपकरण नेमकं काय आहे आणि याचा काय उपयोग आहे, जाणून घेऊया.

या सराव सत्रातील विशेष चर्चेचा विषय ठरला तो भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल. सरावादरम्यान शुबमन दीपिंदर गोयल यांनी विकसित केलेल्या ‘टेम्पल’ (Temple) नावाच्या अत्याधुनिक AI फिटनेस ट्रॅकिंग डिव्हाइसचा वापर करताना दिसला. हे उपकरण अद्याप बाजारात लॉन्च करण्यात आलेलं नाही. गिलने या नव्या तंत्रज्ञानाची चाचणी घेत नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. यावेळी त्याच्यासह इशान किशन आणि केएल राहुलही उपस्थित होते. सरावाला सुरुवात करण्यापूर्वी गिलने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी मालिकेच्या तयारीसह संघातील खेळाडूंच्या भूमिकांबाबत सविस्तर चर्चा केली.

काय आहे शुबमन गिलने लावलेलं टेम्पल डिव्हाईस?

‘टेम्पल’ हे AI डिव्हाइस अद्याप बाजारात दाखल झालेलं नसलं, तरी त्याचा नेमका वापर कशासाठी केला जाणार आहे, याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. कपाळावर, डोळ्यांच्या अगदी वरच्या बाजूला लावल्या जाणाऱ्या या उपकरणाच्या माध्यमातून मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह, मज्जासंस्थेच्या प्रतिक्रिया आणि शारीरिक मेहनतीदरम्यान निर्माण होणारा मानसिक ताण मोजला जातो, असं सांगितलं जात आहे. यापूर्वी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिलाही हे उपकरण वापरताना पाहण्यात आलं होतं.

‘टेम्पल’ हे प्रायोगिक हेल्थ वेअरेबल डिव्हाइस असून, मेंदूतील रक्तप्रवाहाशी संबंधित बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी ते विकसित करण्यात आलं आहे. या उपकरणामध्ये ‘ब्रेनफ्लो’ (BrainFlow) नावाची प्रणाली वापरण्यात आली आहे. कानशिलाजवळील भागातील ऊती आणि रक्तवाहिन्यांमधून मिळणारे संकेत गोळा करण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. दीपिंदर गोयल यांच्या मते, दैनंदिन जीवनातील विविध परिस्थितींमध्ये मेंदूतील रक्तप्रवाहाशी संबंधित बदलांचे सातत्याने निरीक्षण करणं हा या तंत्रज्ञानाचा उद्देश आहे. हालचाली, शरीराची ठेवण आणि दैनंदिन कामांमुळे या मोजमापांमध्ये कसे बदल होतात, हे समजून घेण्यासही याची मदत होऊ शकते.

Shubman Gill wearing teampl AI Device
टेम्पल डिव्हाईस वापरत सराव करणारा शुबमन गिल

या उपकरणामध्ये ‘एन्ट्रॉपी’ (Entropy) नावाचं एक ट्रॅकिंग परिमाण आहे. गोयल यांनी याचे वर्णन ‘जिवंत राहण्यासाठी शरीराला कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचे रिअल-टाइम मोजमाप’ असं केलं आहे. झोप, मानसिक ताण, व्यायाम, कॅफिनचे सेवन आणि मेडिटेशन यांसारख्या घटकांनुसार या मोजमापात बदल होतात. हे मोजमाप दर सेकंदाला अपडेट केलं जातं आणि ते १ ते २५० या श्रेणीत दर्शवलं जातं. या श्रेणीत १ हा सर्वात खोल विश्रांतीच्या अवस्थेशी संबंधित स्तर आहे, तर २५० हा शारीरिक क्षमतेचा सर्वोच्च स्तर आणि अत्युच्च कामगिरीशी संबंधित आहे.

गोयल यांच्या म्हणण्यानुसार, अत्यंत फिट आणि मेडिटेशनचा दीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तींचे सर्वात कमी गुण आहेत. याउलट, सर्वोच्च पातळीवर कामगिरी करणाऱ्या अव्वल खेळाडूंमध्ये सर्वाधिक गुण नोंदवले गेले आहेत.

Shubman Gill Temple AI Device
शुबमन गिल टेम्पल डिव्हाईस

‘टेम्पल’ डिव्हाइस वापरून व्यायाम किंवा आंघोळ करता येते का?

दीपिंदर गोयल यांच्या म्हणण्यानुसार, होय, डिव्हाइस वापरून व्यायाम किंवा आंघोळ करता येते. ‘टेम्पल’ हे उपकरण धावताना, उड्या मारताना, व्यायाम करताना, सॉनामध्ये जाताना, आंघोळ करताना आणि पोहतानाही शरीरावर व्यवस्थित चिकटून राहील, अशा पद्धतीने तयार करण्यात आलं आहे. मात्र, स्कूबा डायव्हिंग करताना हे उपकरण वापरणं हा अपवाद असल्याचं सांगितलं जातं. या डिव्हाइसच्या कडा गुळगुळीत ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून कपड्यांमध्ये ते सहज अडकणार नाही. गोयल यांच्या मते, ‘टेम्पल’ वापरताना चेहरा धुणं, त्वचेची काळजी घेणारी उत्पादने लावणं आणि मेकअप करणंही शक्य आहे.

Temple Device photo
टेम्पल डिव्हाईस फोटो

‘टेम्पल’ डिव्हाइस कसं वापरलं जातं?

‘टेम्पल’ या उपकरणाची रचना इतर फिटनेस वेअरेबल्सपेक्षा वेगळी आहे. हे उपकरण डोक्याभोवती पट्टा बांधून वापरावं लागत नाही. त्याऐवजी, ‘ग्रिप्स’ (Grips) नावाच्या खास चिकट पॅचच्या मदतीने ते त्वचेवर बसवलं जातं. दीपिंदर गोयल यांच्या म्हणण्यानुसार, या ग्रिप्स एकदाच वापरण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. दैनंदिन हालचालींदरम्यानही उपकरण जागेवर स्थिर राहावं, हा त्यामागील उद्देश आहे.

व्यायाम करताना, आंघोळ करताना, पोहताना किंवा ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना हे उपकरण घालता येतं, असं गोयल यांनी सांगितलं आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने कंपनी दर दोन ते तीन दिवसांनी ग्रिप बदलण्याची शिफारस करते. मात्र, गोयल यांच्या म्हणण्यानुसार, काही युजर्स उपकरणाच्या बॅटरीची क्षमता लक्षात घेऊन एकच ग्रिप सुमारे सात दिवस वापरू शकतात. एकदा काढलेली ग्रिप पुन्हा वापरण्यासाठी तयार केलेली नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन ग्रिप लावणं आवश्यक आहे.

Deepinder Goyal Founder of Temple AI device
टेम्पल डिव्हाईसचे फाऊंडर दिपिंदर गोयल

मात्र, या सर्व गोष्टी गोयल आणि कंपनीने केलेल्या उत्पादनाच्या वापरासंबंधीच्या दाव्यांवर आधारित आहेत. त्यांना स्वतंत्र वैद्यकीय शिफारशी समजू नये. हे उपकरण बाजारात उपलब्ध झाल्यानंतर वापरकर्त्यांनी उत्पादकाने दिलेल्या अंतिम सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.