अर्जेंटिना-इजिप्तच्या सामन्यातल्या वादाचे पडसाद अजूनही मिटलेले नाहीत. इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांनी दोन्ही हात एकमेकांवर ठेऊन केलेल्या खुणेवरून चर्चा पेटली आहे. रेफरींनी दिलेल्या काही निर्णयांमुळे चिडलेल्या इजिप्तच्या प्रशिक्षकांनी चेहऱ्यासमोर दोन्ही हात एकमेकांवर क्रॉस पद्धतीने ठेऊन खूण केली. इजिप्तचे प्रशिक्षक तावातावाने आपला मुद्दा मांडत होते. त्याचा अर्थ काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
मोस्ताफा झिकोने केलेला गोल VAR प्रणालीने अवैध ठरवला. मोहम्मद सलाहला पेनल्टी मिळाली असती. रेफरी फ्रान्कोइन्स लेटक्झिर यांनी पेनल्टी रिव्ह्यू न करण्याचा निर्णय घेतला. काही मिनिटातंच अर्जंटिनाने गोल केला.
२०२४ पासून फिफाने एक्स चिन्हाला म्हणजे सामन्यादरम्यान वर्णद्वेषी घटनेचा निषेध नोंदवण्यासाठीचा इशारा म्हणून अधिकृत मान्यता दिली. खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, रेफरी यांच्यापैकी कुणीही हे चिन्ह दर्शवू शकतात.
असं चिन्ह कोणी दर्शवल्यानंतर रेफरी तीनस्तरीय शिष्टाचाराचं पालन करतात. तात्पुरत्या स्वरुपासाठी सामना थांबवून यासंदर्भात घोषणा करणे, आक्षेपार्ह स्वरुपाचं वर्तन कायम राहिल्यास खेळ थांबवणे, विषय हाताबाहेर गेल्यास सामना रद्द करणे.
अर्जेंटिना आणि इजिप्त लढतीत मात्र रेफरींनी या शिष्टाचाराचं पालन केलं नाही. त्यामुळे सामना थांबला नाही किंवा रद्दही झाला नाही. अर्जेंटिनाला धार्जिणे निर्णय घेतल्याचं इजिप्तच्या प्रशिक्षकांचं म्हणणं होतं. मात्र होसाम हसन यांनी वर्णद्वेषी कारणांसाठी असा इशारा केल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. फिफाकडे इजिप्त फुटबॉल संघटनेनं कोणत्याही स्वरुपाच्या दुजाभाव झाल्याची तक्रार नोंदवलेली नाही. आमच्या संघावर अन्याय झाला आहे अशी हसन यांची मागणी होती. VAR प्रणालीवरही त्यांनी टीका केली. रेफरींच्या निर्णयामुळे इजिप्तच्या संघाचं अपरिमित नुकसान झालं आणि अर्जेंटिनाला थेट फायदा मिळाला. त्यांनी सामना जिंकला आणि क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली.
अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीत इजिप्तचा संघ २-० असा आघाडीवर होता. इजिप्तने केलेला एक गोल रेफरींनी फाऊल म्हणून फेटाळून लावला. सामन्याच्या अगदी शेवटच्या सत्रात अर्जेंटिनाने जोरदार मुसंडी मारत २-२ अशी बरोबरी साधली. शेवटच्या काही मिनिटांमध्ये अर्जेंटिनाने आणखी एक गोल करत थरारक विजय मिळवला.
