Rohit Sharma First Earning: भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा भारत आणिव वेस्ट इंडिज या दोन्ही संघांदरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याने चांगली सुरूवात करून दिली होती. पण अर्धशतक झळकावण्याआधी तो माघारी परतला होता. दरम्यान नेहमीच आपल्या मैदानावरील कामगिरीमुळे चर्चेत असणारा रोहित शर्मा आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या रोहित शर्मा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. पण आपल्या पहिल्या कमाईतून काय खरेदी केलं होतं? याबाबत हिटमॅनने खुलासा केला आहे.

रोहित शर्माने गेल्या २ दशकांपासून क्रिकेटचं मैदान गाजवलं आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेक रेकॉर्ड मोडल्यानंतर त्याने १९ सप्टेंबरला टीव्ही शोमधून आपल्या नव्या इनिंगला सुरूवात केली. त्याच्या नव्या शोचं नाव फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा असं आहे. या शोमध्ये तो होस्टच्या भूमिकेत आहे. यादरम्यान त्याने आपल्या आयुष्यातील आणि क्रिकेट कारकिर्दीतील मजेशीर आणि भावूक करणारे किस्से देखील सांगितले आहेत. दरम्यान क्रिकेट खेळत असताना मिळालेल्या पहिल्या कमाईतून त्याने काय खरेदी केलं होतं, याबाबत आता खुलासा केला आहे.

फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा या शो मध्ये नेहा धुपियाने रोहितला विचारलं की, “तुम्ही तुमच्या पहिल्या कमाईचं काय केलं होतं?”, या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित म्हणाला, “मी माझ्या पहिल्या कमाईतून फोन खरेदी केला. त्यावेळी आम्हाला रोजच्या जेवणासाठी पैसे मिळायचे. पण मी ते पैसे जेवणावर खर्च न करता साठवायचो. आम्हाला खूप जास्त प्रवास करायला लागायचाय. त्यामुळे मला माझ्या कुटुंबियांच्या संपर्कात राहता येत नव्हतं. त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “त्यावेळी सर्वांकडे फोन होता, पण माझ्याकडे नव्हता. त्यामुळे मला बाहेर असलेल्या लोकांशी संवाद साधता येत नव्हता. त्या परिस्थितीत फोन खरेदी करणं योग्य गुंतवणूक ठरेल, असं मला त्यावेळी वाटलं. त्यामुळे मी पैसे साठवले आणि फोन खरेदी केला. ती माझी पहिली गुंतवणूक होती. त्यानंतर मला जेव्हा पहिला चेक मिळाला, तेव्हा मी संपूर्ण रक्कम माझ्या कुटुंबियांना दिली.”