Sunil Gavasakar Vaibhav Sooryavanshi Viral Video: आयपीएल २०२६ एलिमिनेटरपूर्वी राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा दिग्गज खेळाडूंच्या पाया पडतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्याने सुनील गावस्कर व संजय बांगर यांच्याजवळ जाऊन त्यांची भेट घेत पाया पडत आशीर्वाद घेतला होता, क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. वैभवला यादरम्यान सुनील गावस्करांनी नेमका काय आशीर्वाद दिली होता, याचा खुलासा गावस्कर यांनी केला आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या २९ चेंडूत ९७ धावांची वादळी खेळी करत वैभवने राजस्थानला क्वालिफायर-२ मध्ये पोहोचवलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभव ९७ धावांवर बाद झाल्याने त्याचं विक्रमी आणि वेगवान शतक मात्र हुकलं. पण त्याच्या या वादळी खेळीचं कौतुक करताना सुनील गावस्करांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूला समालोचन करताना शब्द अपुरे पडले होते.
वैभवच्या फलंदाजीइतकाच सामन्यापूर्वीचा एक भावनिक क्षणही चर्चेत राहिला. वॉर्म-अपदरम्यान वैभव थेट ब्रॉडकास्ट सेटजवळ गेला आणि लाईव्ह शो सुरू असताना त्याने सुनील गावस्कर तसेच माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या पायांना स्पर्श करत आशीर्वाद घेतले. या कृतीतून वैभवचा नम्र स्वभाव आणि आदर स्पष्टपणे दिसून आला. त्या क्षणाने चाहत्यांची मनं जिंकली आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली.
वैभव सूर्यवंशी पाया पडल्यानंतर सुनील गावस्करांनी काय आशीर्वाद दिला?
इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या मुलाखतीत सुनील गावस्कर यांना या व्हायरल क्षणाची आठवण करून देण्यात आली. तसेच, “जर तुम्ही राजस्थान रॉयल्सकडून वैभवसोबत फलंदाजी करत असता, तर त्याला काय सांगितलं असतं?” असा प्रश्नही विचारण्यात आला.
यावर गावसकर म्हणाले की, त्यांनी सामन्यापूर्वी वैभवला जे सांगितलं होतं, तेच पुन्हा सांगितलं असतं. “मी त्याला तेच सांगितलं असतं, जे काल सामन्यापूर्वी सांगितलं. आम्ही मैदानावर शो करत होतो. तेव्हा तो आला, माझ्या पायांना स्पर्श करत त्याने आशीर्वाद घेतला आणि मी त्याला फक्त एवढंच म्हणालो, ‘लगे रहो बेटे, लगे रहो’ म्हणजेच असाच पुढे जात राहा. जर मी त्याच्यासोबत दुसऱ्या टोकाला फलंदाजी करत असतो, तरीही मी त्याला हेच सांगितलं असतं,” असं गावस्कर म्हणाले.
भारतीय क्रिकेटमधील पुढचा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी ठरणार का? असा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे. आयपीएल २०२६ मध्ये वैभवने अक्षरशः धुमाकूळ घालत ६८० धावा केल्या आहेत. इतकंच नाही, तर एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रमही त्याने मोडला आहे.
वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटमधील Next Big thing ठरणार का, यावर सुनील गावसकर यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. “आतापर्यंत आम्ही जे पाहिलं आहे, त्यानुसार तो नक्कीच पुढचा मोठा स्टार ठरू शकतो. एवढ्या कमी वयात तो ज्या प्रकारचे फटके खेळतोय आणि ज्या सहजतेने खेळतोय, ते पाहता तो खरोखरच खूप खास खेळाडू आहे,” असं गावसकर म्हणाले.
