IND vs WI What if Match Got Washed Out Semifinal Scenario: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सध्या सुपर ८ सामने सुरू आहेत. २६ फेब्रुवारीला झालेल्या भारत आणि झिम्बाब्वे सामन्यात विजय मिळवत सेमीफायनलच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या सामन्यात भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची गरज होती आणि टीम इंडियाने ७१ धावांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करत भारताला अपेक्षित अशी मदत केली. यानंतर आता भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुपर ८ सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार? जाणून घेऊया.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुपर-८ सामना हा व्हर्च्युअल क्वार्टर सेमीफायनलसारखा असेल. हा सामना १ मार्चला कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. पण या सामन्यापूर्वी एक प्रश्न सर्वांना सतावतोय, तो म्हणजे हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार, आयसीसीचा यासाठी काय नियम आहे, जाणून घेऊया.
भारत-वेस्ट इंडिज सामना रद्द झाल्यास काय होणार?
जर भारत आणि वेस्ट इंडिजमधील सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यासह भारतीय संघाचे तीन गुण होतील आणि वेस्ट इंडिजचेही तीन गुण होतील. पण जर वेस्ट इंडिजचा नेट रन रेट चांगला असल्याने विंडिज संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी होईल आणि टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडेल.
टीम इंडियाचा नेट रन रेट सध्या -०.१०० आहे. तर वेस्ट इंडिजचा नेट रन रेट +१.७९१ आहे. आता, टीम इंडियाकडे या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे विजय मिळवणं. त्यामुळे आता टीम इंडिया फक्त सामना जिंकूनच उपांत्य फेरीत पोहोचू शकते.
या विश्वचषकात आतापर्यंत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना वगळता, त्यांनी आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. पहिल्या सुपर ८ सामन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. याआधी, भारताने गट टप्प्यातील चारही सामने जिंकले होते. यानंतर सुपर-८ मधील दुसरा सामना झिम्बाब्वेविरूद्ध जिंकला आहे. यानंतर आता वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात विजय मिळवण्याच्या उद्देशाने संघ मैदानात उतरणार आहे.
