Tilak Varma On Hardik Pandya: गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात तिलक वर्माच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. मुंबईने पहिल्या डावात फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. यादरम्यान मुंबईकडून फलंदाजी करताना तिलक वर्माने नाबाद १०१ धावांची खेळी केली. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक ठरलं. दरम्यान शतक झळकावण्याआधी १४ व्या षटकात हार्दिक पंड्या त्याला काहीतरी बोलताना दिसून आला होता. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं, याबाबत तिलक वर्माने खुलासा केला आहे.

नेमकं काय घडलं?

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण मुंबईला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. सुरूवातीचे ३ विकेट्स गेल्यानंतर तिलक आणि नमन धीरने मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केल. त्यानंतर हार्दिकने तिलकला साथ दिली. १४ व्या षटकापर्यंत तिलक वर्मा मोठे फटके खेळणं टाळत होता. त्यावेळी टाईम आऊट दरम्यान हार्दिक पंड्या त्याला मोठ्याने काहीतरी बोलताना दिसून आला. त्यानंतर तिलकने तुफान फटकेबाजी केली आणि २२ चेंडूत ८५ धावा कुटल्या.

हार्दिकसोबत काय बोलणं झालं, याबाबत भाष्य करताना तिलक वर्मा म्हणाला, “हार्दिक माझा उत्साह वाढवत होता. त्याला माहीत आहे मी करू शकतो.त्यामुळेच तो मला बोलता होता. मी त्याला हेच म्हणालो की, होऊन जाईल.” हार्दिकने जोश भरल्यानंतर तिलकने गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि ४५ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याचं आयपीएल कारकिर्दीतील पहिलंच शतक ठरलं. या शतकी खेळीच्या बळावर त्याने सामनावीर पु्रस्कार आपल्या नावावर केला.

सामना झाल्यानंतर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, “मला हेच जाणवलं की, तिलकमध्ये जे टॅलेंट आहे, ते पाहता त्याने कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे मी त्याला एकच गोष्ट सांगत होतो की, तू फक्त चेंडूवर लक्ष ठेव आणि फटकेबाजी कर. बाकी इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करू नकोस.कारण मला त्याच्यावर विश्वास आहे. तो ज्या पद्धतीने फटकेबाजी करतो, ते खूप खास आहे.आता वेळ आली होती, त्याने मैदानात यावं आणि आपली क्षमता सिद्ध करावी.”