IPL 2026 RCB vs KKR Weather Update: आयपीएल २०२६ चा आजचा १३ मे रोजी होणारा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण पावसामुळे सामन्याची नाणेफेकदेखील उशिरा होणार आहे. पण जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणत्या संघाला जास्त फटका बसणार, जाणून घेऊया.

आरसीबी आणि केकेआर यांच्यातील या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी, रायपूरमधील हवामानामुळे दोन्ही संघ आणि चाहते चिंतेत आहेत. या सामन्यावर मुसळधार पावसाचे सावट आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे: पावसामुळे सामना रद्द झाल्यास आरसीबीच्या प्लेऑफच्या आशांना किती धक्का बसणार, जाणून घेऊया. आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्याची नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होणार होती. पण पावसामुळे मैदान पूर्णपणे झाकलेलं आहे. ८.१५ वाजता मैदानाची पाहणी केली जाणार आहे.

रायपूरमधील हवामान

आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने छत्तीसगडमधील अनेक भागांसाठी तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. रायपूरसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. पावसाची शक्यता सुमारे ३० टक्के असल्याचा अंदाज आहे. चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता खूपच कमी आहे. पण पावसामुळे सामना सुरू होण्यासाठी व्यत्यय येऊ शकतो. सामन्यादरम्यान तापमान ३५ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षकांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.

आरसीबी-केकेआर सामना रद्द झाल्यास काय होणार?

जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि पाच षटकांचा खेळही होऊ शकला नाही, तर सामना रद्द केला जाईल. पावसामुळे सामना रद्द झाल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. पण, हा एक गुण आरसीबीसाठी फारसा हानिकारक ठरणार नाही. यामुळे बंगळुरूच्या गुणांची संख्या १५ होईल, ज्यामुळे ते आधीच पहिल्या दोन स्थानांवर राहतील आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना त्यांच्या उर्वरित दोन सामन्यांमधून फक्त आणखी एका गुणाची आवश्यकता असेल. शिवाय, संघाचा नेट रन रेटही खूप मजबूत आहे.

पण ही परिस्थिती केकेआरसाठी खूप कठीण ठरू शकते. जर सामना रद्द झाला, तर त्यांच्याकडे फक्त १० गुण असतील आणि उरलेले तीन सामने जिंकूनही ते जास्तीत जास्त १६ गुणांपर्यंतच पोहोचू शकतील. सध्याची अटीतटीची स्पर्धा आणि कमी नेट रन रेट पाहता, प्लेऑफसाठी पात्र ठरण्याकरिता हा आकडा पुरेसा नसेल आणि कोलकाता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.