देशांतर्गत क्रिकेटमधल्या सगळ्यात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेची फायनल हुबळीत सुरू आहे. कर्नाटक आणि जम्मू काश्मीर यांच्यात सुरू असलेल्या मुकाबल्यात तिसऱ्या दिवसअखेर काश्मीरचं पारडं जड आहे. पाचव्या दिवसअखेर सामना अनिर्णित झाल्यास रणजी करंडक कोणाला मिळतो? हा प्रश्न पडणं साहजिक आहे.
पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या जम्मू काश्मीरने पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभारला आहे. शुभम पुंडीरने १२ चौकार आणि २ षटकारांसह १२१ धावांची खेळी केली. यावर हसन (८८), कर्णधार पारस डोगरा (७०), अब्दुल समद (६१), कन्हैया वाधवान (७०), साहिल लोटरा (७२) या पाचजणांनी अर्धशतकी खेळी केल्या. कर्नाटकतर्फे प्रसिध कृष्णाने ५ विकेट्स पटकावल्या.
फॉलोऑन टाळण्यासाठी कर्नाटकला २९२ धावांची आवश्यकता आहे. आक्विब नबीच्या अफलातून चेंडूवर अनुभवी के.एल.राहुल त्रिफळाचीत झाला. त्याने १३ धावा केल्या. यंदाच्या रणजी हंगामात झंझावाती फॉर्मात असणारा कर्नाटकचा कर्णधार देवदत्त पड्डीकल ११ धावा करून तंबूत परतला. नबीने करुण नायरला भोपळाही फोडू दिला नाही. उत्तम फॉर्मात असणारा रवीचंद्रन स्मरणही शून्यावरच बाद झाला. श्रेयस गोपाळ ८३ चेंडूत २७ धावांची खेळी केली. युधवीर सिंगने त्याला बाद केलं. अनुभवी सलामीवीर मयांक अगरवालने खणखणीत शतकी खेळी साकारली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्नाटकच्या पहिल्या डावात २२०/५ धावा झाल्या आहेत. कर्नाटकचा संघ अजूनही ३६४ धावांनी पिछाडीवर आहे. फॉलोऑन वाचवण्यासाठी त्यांना ७२ धावांची आवश्यकता आहे.
पाचव्या दिवसअखेर सामना अनिर्णित अवस्थेत संपल्यास जेतेपदाचा करंडक कोणाला मिळतो हे जाणून घेणं उत्सुकतेचं आहे.
नियमांनुसार विचार केला तर,
पाचव्या दिवसअखेर, कर्नाटकने जम्मू काश्मीरने उभारलेल्या धावसंख्येला पार करत पहिल्या डावातील आघाडी मिळवली तर कर्नाटकला विजयी घोषित करण्यात येईल.
पाचव्या दिवसअखेर किंवा त्याआधीच, जम्मू काश्मीरने उभारलेल्या धावसंख्येचा प्रतिकार करताना कर्नाटकचा डाव आटोपला तर जम्मू काश्मीर विजयी होईल.
पावसामुळे कर्नाटकचा पहिला डाव पूर्ण होऊ शकला नाही तर बीसीसीआयच्या प्लेइंग कंडिशन्सनुसार, कर्नाटकला प्राथमिक फेरीत अधिक गुण असल्यामुळे विजयी घोषित करण्यात येईल.
पहिला डाव पूर्ण न झाल्यास
कोणत्याही कारणास्तव दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा पहिला डाव पूर्ण होऊ शकला नाही तर काय? याचं उत्तर इतिहासातल्या एका सामन्यात आहे. १९८१-८२ हंगामात कर्नाटक आणि दिल्ली यांच्यात रणजी करंडक स्पर्धेंचा अंतिम मुकाबला रंगला होता. कर्नाटकने ७०५ धावांचा डोंगर उभारला. पाचव्या दिवसअखेर दिल्लीचा पहिला डाव पूर्ण होऊ शकला नाही. पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी सहाव्या दिवशी खेळ सुरू ठेवला. दिल्लीने ७०७/८ अशी मजल मारली. दिल्लीने सहाव्या दिवसअखेर पहिल्या डावातील आघाडी मिळवल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं
सुधारित नियमांनुसार रणजी ट्रॉफी फायनलचा सामना ५ दिवसांचाच असतो. पाचव्या दिवसअखेर विजेता घोषित केला जातो. पाचव्या दिवसअखेरपर्यंत कर्नाटकचा पहिला डाव कोणत्याही कारणास्तव (पाऊस, अंधुक प्रकाश) पूर्ण होऊ शकला नाही तर सामना अनिर्णित होईल.

