What Happen to India Semi Final Chances if WI beat SA: भारतीय संघाला सेमीफायनल गाठण्यासाठीचं समीकरण आता गुंतागुंतीचं झालं आहे. सुपर-८ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताला ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता गुरुवारी चेन्नईमध्ये होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सुपर-८ सामन्यात भारतासाठी ‘करो किंवा मरो’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या भारताचं लक्ष वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यावर आहे. या सामन्यात जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर भारतासाठी कसं समीकरण असणार जाणून घेऊया.
भारताला सेमीफायनलच्या आशा कायम ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत करणं आवश्यक आहे. अन्यथा भारताच्या सेमीफायनल पात्रतेच्या शक्यतांवर मोठा परिणाम करू शकतो. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात विकेट्स घेत चांगली सुरूवात केली. पण अखेरीस जेसन होल्डर व रोमारियो शेफर्ड यांनी संघाला १७६ धावांपर्यंत पोहोचवलं. होल्डरने ४९ धावा केल्या, तर शेफर्ड ५२ धावांची अर्धशतकी खेळी करत नाबाद परतला. यासह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १७७ धावांची गरज आहे.
वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर भारत स्पर्धेबाहेर होणार?
जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर भारतासाठी समीकरण अधिक गुंतागुंतीचं होणार आहे. दक्षिण आफ्रिकेला जर तब्बल ५० धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केवळ १ धावेनी कसाबसा विजय मिळवला, तर अशा परिस्थितीत भारत नेट रनरेटमध्ये दक्षिण आफ्रिकेपेक्षा पुढे जाण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध सुमारे ५३ धावांनी विजय मिळवावा लागेल.
सुपर-८ मधील पहिल्या गटातील संपूर्ण गणित मोठ्या प्रमाणात वेस्ट इंडिजच्या निकालांवर अवलंबून आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्यांचा १०७ धावांचा मोठा विजय भविष्यात निर्णायक ठरू शकतो, विशेषतः जर अनेक संघ समान गुणांसह बरोबरीत राहिले तर विडिंज संघाचा नेट रेन रेट त्यांच्यासाठी मोठी भूमिका बजावणारा ठरेल. जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं, तर गुणतालिका अधिकच चुरशीची बनेल आणि सेमीफायनलच्या शर्यतीत तीन संघांमध्ये तिहेरी लढत निर्माण होऊ शकते. अशा वेळी अंतिम निर्णय नेट रनरेटवरच अवलंबून राहील.
समजा भारताने झिम्बाब्वेविरूद्ध प्रथम फलंदाजी करत २०० धावा केल्या आणि झिम्बाब्वेला ५५ धावांनी पराभूत केलं. तर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला १० धावांनी हरवलं आणि पुढे दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला कोणत्याही फरकाने मात दिली, तर अशी परिस्थिती निर्माण होईल की भारताला शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध नेट रनरेटमध्ये आघाडी घेण्यासाठी अंदाजे ६१ धावांनी विजय मिळवावा लागेल. म्हणजेच, भारतासाठी केवळ विजय पुरेसा नसून मोठ्या फरकाने विजय मिळवणं अत्यावश्यक ठरणार आहे.

