RCB vs MI Last Ball Thriller: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन संघाला शेवटच्या चेंडूवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला अवघ्या १६६ धावांपर्यंत मजल मारता आली. या धावांचा बचाव करताना मुंबईच्या गोलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण कृणाल पंड्याने अर्धशतक झळकावून सामना मुंबईपासून दूर नेला. पण शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत मुंबईला विजयाची संधी होती. पण शेवटच्या चेंडूवर असं काही घडलं, ज्यामुळे मुंबईला हा सामना गमवावा लागला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

शेवटच्या चेंडूवर नेमकं काय घडलं?

मुंबईकडून शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी सूर्याने राज अंगद बावाकडे सोपवली होती. जो आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पहिल्याच सामन्यात त्याला निर्णायक षटक टाकावं लागलं. त्याने सुरुवातीचे ५ चेंडू चांगले टाकले. पण शेवटच्या चेंडूवर जे नव्हतं व्हायचं तेच झालं.

शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला विजयासाठी २ धावा करायच्या होत्या. त्यावेळी रसिक सलाम स्ट्राईकवर होता. राज बावाने त्याच्या बॅटच्या समोर चेंडू टाकला. हा चेंडू रसिकने ढकलला आणि १ धाव घेण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू सरळ राज बावाच्या हातात गेला, पण फॉलो थ्रूमध्ये तो चेंडू अडवू शकला नाही. त्याने जर चेंडू अडवला असता, तर १ धाव देखील पूर्ण होऊ शकली नसती. हा सामना मुंबईने सहज जिंकला असता. त्यामुळे रसिकने वेगाने एक धाव पूर्ण केली. त्यानंतर राज बावाने पुढील धाव रोखण्यासाठी आणि धावबाद करण्यासाठी स्टंपजवळ येणं गरजेचं होतं. पण तो तिथेच उभा राहिला. त्याने स्टंपजवळ येण्यास उशीर केला, त्यामुळे क्षेत्ररक्षकाला चेंडू किपरच्या दिशेने थ्रो करावा लागला. जर राज बावा स्टंपच्या जवळ असता, तर तो सहज धावबाद करू शकला असता. असं झालं असतं, तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पण असं काहीच झालं नाही. त्यामुळे मुंबईला हाती आलेला सामना गमवावा लागला.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर नमन धीरने ४७ धावा केल्या. तर रोहित शर्मा अवघ्या २२ धावा करून माघारी परतला. मुंबईने पहिल्या डावात ७ गडी बाद १६६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तर जेकब बेथेलने २७ धावा केल्या आणि जितेश शर्माने १८ धावांचे योगदान दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शेवटच्या चेंडूवर २ गडी राखून विजयाची नोंद केली.