India vs Afghanistan Quarter Final, Asian Games 2026: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेचा थरार जपानमच्या आयची- नागोया येथे सुरू आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. आता भारतीय पुरुष क्रिकेट संघ सुवर्णपदक पटकावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ थेट क्वार्टर फायनलचा सामना खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना जिंकेल, तो संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार? जाणून घ्या.

या स्पर्धेत जपान आणि नेपाळ या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे अफगाणिस्तानला थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे. २८ सप्टेंबरला भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये क्वार्टर फायनलचा थरार रंगणार आहे. पण या सामन्याआधी पावसाने टेन्शन वाढवलं आहे. याआधीही पावसामुळे काही सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे भारत- अफगाणिस्तान सामना रद्द झाला, तर काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

भारत- अफगाणिस्तान सामना रद्द झाला, तर काय होणार?

आशियाई क्रीडा स्पर्धेत २८ सप्टेंबरला एकाच दिवशी २ सामने खेळवण्यात येणार आहे. सकाळी होणाऱ्या पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना हाँगकाँगविरुद्ध होणार आहे. तर दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर २९ सप्टेंबरला होणाऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात श्रीलंका आणि नेपाळ हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तर चौथ्या सामन्यात बांगलादेशचा सामना मलेशियाविरुद्ध होणार आहे. यापैकी ४ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा सामनाा पावसामुळे किंवा अन्य कुठल्याही कारणास्तव रद्द झाला, तर नियमानुसार सेमीफायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या संघाचा निर्णय हा आयसीसी रँकिंगनुसार केला जाईल. आयसीसी रँकिंगमध्ये जो संघ विरोधी संघाहून पुढे असेल, तो संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्याती क्वार्टर फायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारतीय संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे भारतीय संघाकडे आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.