India vs Pakistan, Asian Games 2026 Final: आशियाई क्रीडा स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. गोल्ड मेडलसाठी होणारा हा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. याआधी झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने १२४ धावांनी एकतर्फी विजयाची नोंद केली होती. भारतीय संघाचं एक मेडल फिक्स झालं आहे. पण भारतीय संघाचं लक्ष्य पाकिस्तानला पराभूत करून गोल्ड मेडल जिंकण्यावर असणार आहे. पण या सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द झाला, तर गोल्ड मेडल कोणाला मिळणार? जाणून घ्या काय आहे आशियाई क्रीडा स्पर्धेचा नियम? जाणून घ्या.
भारतीय संघाचा फायनलमध्ये प्रवेश
भारतीय संघाला या स्पर्धेत थेट क्वार्टरफायनल खेळण्याची संधी मिळाली होती. क्वार्टरफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार होता. पण हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने, भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला. सेमीफायनलमध्ये भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने १६९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा डाव अवघ्या ४५ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना मोठ्या फरकाने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला.
भारत- पाकिस्तान सामना रद्द होणार?
भारत- पाकिस्तान सामन्यात पाऊस महत्वाची भूमिका बजावणार आहे. अॅक्यूवेदरने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता ही ६२ टक्के इतकी असणार आहे. तर दुपारच्या सत्रापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता २५ टक्के इतकीच असणार आहे. त्यामुळे सामना तर होऊ शकतो, पण पावसामुळे सामना बराच वेळ थांबू शकतो.
सामना रद्द झाल्यास काय होणार?
जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर यावेळी क्रिकेट चाहत्यांना नवा नियम पाहायला मिळणार आहे. याआधी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील फायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यावेळी आयसीसी रँकिंगमध्ये वरच्या स्थानी असलेल्या भारतीय संघाला गोल्ड मेडल देण्यात आलं होतं. पण यावेळी असं नसेल. स्पर्धेच्या नव्या नियमानुसार, जर हा सामना रद्द झाला, तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये गोल्ड मेडल शेअर केलं जाईल.
