SA vs NZ Semi Final T20 WC 2026 What if Cancelled: दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये टी-२० विश्वचषक २०२६ चा सेमीफायनल सामना खेळवला जाणार आहे. हा सामना आज म्हणजेच ४ मार्चला कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होत आहे. सुपर ८ मधील अ गटात अव्वल स्थान मिळवून दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. दरम्यान, न्यूझीलंडने ब गटात दुसरं स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली. आता प्रश्न असा आहे की, कोणत्याही कारणास्तव या संघांचा सेमीफायनल सामना रद्द झाला, तर अंतिम सामना कोण खेळणार? जाणून घेऊया.

दक्षिण आफ्रिका संघाने सुपर-८ टप्प्यातील सर्व सामने जिंकले आहेत आणि सर्वाधिक ६ गुणांसह पहिल्या स्थानी आहेत. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाला सुपर-८ मधील फक्त एकच सामना जिंकता आला तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे फॉर्मात असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ बाजी मारणार की न्यूझीलंड उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर सामन्यात विजय मिळवणार यावर सर्वांच्या नजरा असतील.

दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड सेमीफायनलसाठी राखीव दिवस आहे का?

टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण पावसामुळे किंवा इतर कारणांस्तव राखीव दिवसानंतरही सामना पूर्ण झाला नाही तर तो सामना रद्द मानला जाईल. आयसीसीच्या नियमांनुसार, जर उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीचे तिकीट दिलं जाईल.

पण थेट दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलचं तिकिट का दिलं जाणार, यामागचं कारण जाणून घेऊया. आयसीसीच्या नियमांनुसार, जर उपांत्य सामना रद्द झाला तर, गटात अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला अंतिम फेरीत स्थान दिलं जाईल. दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हा फायदा आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ सुपर-८ फेरीत पहिल्या स्थानी होता. तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी होता.

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना ईडन गार्डन्स मैदानावर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. तर सामन्याची नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच ६.३० ला होईल. तर हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर मोबाईलवर जिओ हॉटस्टार अॅपवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होईल. तर या सामन्याती विजेता संघ ८ मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळेल.