Zimbabwe vs Ireland: टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. साखळी फेरीतील सामने समाप्त होऊन लवकरच सुपर ८ फेरीतील सामन्यांना सुरूवात होणार आहे. न्यूझीलंडने कॅनडाला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा संघ टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत प्रवेश करणारा सहावा संघ ठरला. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करणार की स्पर्धेतून बाहेर पडणार, हे झिम्बाब्वेच्या पुढील २ सामन्यांच्या निकालावर अवलंबून असणार आहे. झिम्बाब्वेचा पुढील सामना आयर्लंडविरूद्ध होणार आहे.

झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात होणारा सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार दुपारी ३ वाजता सुरू होणं अपेक्षित होतं. पण पावसामुळे हा सामना अजून तरी सुरू झालेला नाही.झिम्बाब्वे आणि आयर्लंडचा संघ ग्रुप बी मध्ये आहे. या ग्रुपमधून ऑस्ट्रेलियाला पराभूत करून श्रीलंकेने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. झिम्बाब्वेचा दोन्ही सामन्यातील पराभव ऑस्ट्रेलियाला स्पर्धेत टिकवून ठेऊ शकतो. पण, पावसामुळे ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर पाणी फेरलं जाण्याची चिन्ह आहेत.

झिम्बाब्वे- आयर्लंड सामना रद्द झाला, तर काय होणार?

झिम्बाब्वेने या स्पर्धेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. २ पैकी २ सामने जिंकून झिम्बाब्वेचा संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वेचे अजूनही २ सामने शिल्लक आहेत. या २ पैकी १ सामना जिंकूनही झिम्बाब्वेचा संघ सुपर ८ फेरीत प्रवेश करू शकतो. आयर्लंडला हरवताच झिम्बाब्वेचा संघ ग्रुप बी मधून सुपर ८ फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल. तर ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. पण जर झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात होणारा सामना पावसामुळे रद्द झाला, तरीसुद्धा झिम्बाब्वेचा संघ सुपर ८ फेरीत स्थान निश्चित करू शकतो. त्यामुळे आता पाऊसही ऑस्ट्रेलियाला वाचवू शकत नाही.

जर ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल, तर त्यांनी पाऊस थांबून झिम्बाब्वे विरूद्ध आयर्लंड सामना झाला पाहिजे, अशी प्रार्थना करावी. जर झिम्बाब्वेने हा सामना गमावला, तर ऑस्ट्रेलियाची सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढेल. त्यानंतर झिम्बाब्वेचा पुढील सामना श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाला प्रार्थना करावी लागेल की, श्रीलंकेकडून झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव व्हायला हवा. तर ऑस्ट्रेलियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना ओमानविरूद्ध होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवणं गरजेचं असणार आहे.