What India now need to reach Women’s T20 World Cup semis: महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज रविवारी २८ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती असलेला सामना आहे. ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर हा सामना खेळवला जात असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यापूर्वी गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर घसरला होता; अ गटामध्ये बांगलादेशचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेने दुसरं स्थान गाठलं आहे. ८ गुणांसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या या विजयानंतर भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी काय करावं लागणार, जाणून घेऊया.
महिला टी-२० विश्वचषकाच्या अ गटातील उपांत्य फेरीच्या दोन जागांसाठीची चुरस अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत रंगली आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होत असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही संघांपैकी कोणते दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार, हे निश्चित होणार आहे.
भारताला टी-२० वर्ल्डकप सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण?
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा चार गडी राखून पराभव करत महत्त्वाचा विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात आठ गुण जमा झाले असून ते ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीला पोहोचले आहेत. परिणामी भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात काय करावं लागेल, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणं आवश्यक आहे. भारताचा ‘नेट रन रेट’ दक्षिण आफ्रिकेपेक्षा खूपच चांगला आहे; त्यामुळे, केवळ ऑस्ट्रेलियाचा पराभव करणंही उपांत्य फेरीतील स्थानासाठी पुरेसं ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट +४.७२४, दक्षिण आफ्रिकेचा +०.६३३ आणि भारताचा +२.२६८ इतका आहे. या गटातील इतर संघ बांगलादेश, पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांची स्पर्धेतील वाटचाल आता संपली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल केला. नंदनी शर्माच्या जागी वेगवान गोलंदाज क्रांती गौडला संधी देण्यात आली. टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारत गेल्या सहा वर्षांपासून वाट पाहत आहे; यापूर्वी त्यांनी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत आठ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताला केवळ दोन सामन्यांत विजय मिळवता आला आहे.
