पुरुष टेनिसपटू निक कुर्यिगास आणि महिला टेनिसपटू अर्यान्का सबालेन्का या दोघांदरम्यान रविवारी बॅटल ऑफ द सेक्सेस मुकाबला रंगणार आहे. सर्वसाधारणणे टेनिसविश्वात पुरुष आणि महिला खेळाडू आपापल्या गटातून खेळतात अपवाद फक्त मिश्र दुहेरी प्रकाराचा. मात्र तिथेही पुरुष आणि महिला एकत्र येऊन प्रतिस्पर्धी पुरुष आणि महिला खेळाडूंशी खेळतात. या लढतीत मात्र कुर्यिगास-सबालेन्का एकेरी प्रकारात आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

महिला टेनिसपटूंच्या जागतिक क्रमवारीत सबालेन्का अव्वल स्थानी आहे तर दुखापतीतून सावरत कुर्यिगास प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करतो आहे. २०२२ मध्ये कुर्यिगासने विम्बल्डन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. बेलारुसच्या २७वर्षीय सबालेन्काच्या नावावर ४ ग्रँड स्लॅम जेतेपदं आहेत. यंदाच्या वर्षी तिने युएस ओपनचं जेतेपद नावावर केलं आहे. याव्यतिरिक्त पाच अन्य स्पर्धांच्या अंतिम फेरीत तिने आगेकूच केली होती.

महिला टेनिसमधल्या जोरदार सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूंमध्ये सबालेन्काची गणना होते. गेल्या हंगामात सबालेन्काने ७१ पैकी ५९ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे कुर्यिगासला २०२३-२४ खेळताच आलेलं नाही. वेगवान आणि आक्रमक खेळासाठी कुर्यिगास ओळखला जातो.

हा सामना ‘बेस्ट ऑफ थ्री’ सेट्स असा असेल. बरोबरी झाल्यास १० पॉइंट्सचा टायब्रेकर असेल. पुरुष आणि महिला खेळाडूंच्या वेगात, वावरात फरक असल्याने सबालेन्काच्या बाजूचं कोर्ट ९ टक्के लहान असणार आहे. दोन्ही खेळाडूंना एकच सर्व्हिस करता येणार आहे.

दुबईत होणारा हा सामना प्रामुख्याने मैत्रीपूर्ण लढत असाच असणार आहे. या लढतीच्या माध्यमातून दोन्ही खेळाडूंना आणि प्रायोजकांना भरपूर पैसा मिळण्याची चिन्हं आहेत. ‘आम्ही निखळ आनंदासाठी खेळणार आहोत, जीव धोक्यात वगैरे घालणार नाही. नैसर्गिकदृष्ट्या पुरुष महिलांपेक्षा ताकदवान असतात. त्यामुळे ताकदवान कोण हे ठरवण्यासाठी ही लढत नाही. महिला टेनिसची लोकप्रियता वाढावी एवढाच उद्देश आहे’, असं सबालेन्काने सांगितलं.

या लढतीसाठी कुर्यिगासची निवड केल्याबद्दल आयोजकांवर टीका होत आहे. मैत्रीपूर्ण लढत असली तरी प्रतिस्पर्ध्यांचा आदर करणारा खेळाडू निवडायला हवा होता असं सोशल मीडियावर चाहते म्हणत आहेत. २०२१ वर्षी गर्लफ्रेंडला शारीरिक त्रास दिल्याची कबुली कुर्यिगासने दिली होती. त्यानंतर त्याने आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणीही केली होती.

‘जिंकणार कोण याची मला काळजी नाही. मी प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो. हा सामनाही त्याला अपवाद नसेल. हा मैत्रीपूर्ण सामना आहे. कारकिर्दीत मी अनेकदा हरलो आहे त्यामुळे हरण्याची भीती नाही’, असं कुर्यिगासने म्हटलं आहे.

खरंच अशा लढतीची गरज आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे. या लढतीमुळे नवा चाहतावर्ग टेनिसला मिळू शकेल असं सबालेन्का आणि कुर्यिगास या दोघांना वाटतं. धमाल, मनोरंजन आणि खेळ या तिन्हीचं मिश्रण असेल. टेनिसविश्वात असे उपक्रम होण्याची आवश्यकता आहे. काही लोकांना याबद्दल साशंकता आहे. १७,००० क्षमतेच्या कोका कोला एरिना इथे होणाऱ्या या सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली आहेत.

लढतीचा ऐतिहासिक संदर्भ काय?

१९७३ साली झालेल्या बॅटल ऑफ द सेक्सेस लढतीत महिला टेनिसपटू बिली जीन किंग यांनी पुरुष टेनिसपटू बॉबी रिग्स यांना हरवलं होतं. किंग यांच्या मते सबालेन्का-कुर्यिगास हा सामना शानदार असेल पण आमच्या वेळेला या लढतीला जे सामाजिक संदर्भ होते ते आता नाहीत.

किंग यांनी तत्कालीन विम्बल्डन विजेते ५५वर्षीय रिग्स यांच्यावर मिळवलेला विजय हा अहंकारी पौरुष मानसिकतेवर मिळवलेला विजय मानला गेला. किंग यांच्या विजयामुळे महिला टेनिसला आज जे स्थान प्राप्त झालं आहे ते मिळालं. या लढतीच्या माध्यमातून लिंगसमानता आणि समान मानधनाचा मुद्दा ऐरणीवर आला. या लढतीनंतर काही वर्षातच WTA अर्थात वूमनस टेनिस असोसिएशनची स्थापना झाली होती. आमचा मुकाबला हा सामाजिक बदलसाठी होता. त्याचे सांस्कृतिक ताणेबाणे वेगळे होते असं किंग यांनी सांगितलं.

कुठे पाहता येणार?

सोनी वाहिन्यांवर आणि अ‍ॅपवर टेनिसप्रेमींना आज रात्री ९.३० वाजता हा मुकाबला पाहता येईल.