What is Buchi Babu Tournament : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. पण, याआधी इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर सारखे टीम इंडियाचे स्टार खेळाडू बुची बाबू स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. पण आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की ही बुची बाबू स्पर्धा काय आहे? त्यामुळे आज आपण बुची बाबू स्पर्धा काय आहे आणि ती कुठे, कधी खेळवली जाणार आहे? जाणून घेणार आहोत.

बुची बाबू स्पर्धा ही देशांतर्गत क्रिकेटचे प्रतिक –

बुची बाबू स्पर्धा ही भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात मानली जाते. ही भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक आहे. मोथावरपू वेंकट महिपती नायडू यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे नाव आले आहे. मोथावरपू वेंकट महिपती नायडू यांना बुची बाबू म्हणूनही ओळखले जायचे. बुची बाबू यांना मद्रासमध्ये क्रिकेटची ओळख करून देणारे अग्रणी मानले जाते.

या बुची बाबू स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. यावेळी बुची बाबू स्पर्धेचे आयोजन तामिळनाडूमध्ये होणार आहे. ही स्पर्धा तामिळनाडूमधील चार वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाईल, ज्यात तिरुनेलवेली, कोईम्बतूर, सेलम आणि नाथम यांचा समावेश आहे. या स्पर्धेला गुरुवार, १५ ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये खेळवल्या जाणाऱ्या चार दिवसांच्या फॉरमॅटनुसार ही स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेत्या संघाला ३ लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला २ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

हेही वाचा – Manu Bhaker Neeraj Chopra : ‘माझ्यात आणि नीरजमध्ये…’, मनू भाकेरने लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मौन; म्हणाली, तो माझा…

या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार असून यामध्ये मध्य प्रदेश, झारखंड, रेल्वे, गुजरात, मुंबई, हरियाणा, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, हैदराबाद, बडोदा आणि दोन स्थानिक संघ सहभागी होणार आहेत. दोन स्थानिक संघ टीएनसीए इलेव्हन आणि टीएनसीए प्रेसिडेंट इलेव्हन असतील. या १२ संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – Sreejesh on Vinesh : ‘ती रौप्यपदकासाठी पात्र आहे पण खेळात नियम…’, विनेशबद्दल श्रीजेशचे मोठे वक्तव्य

बुची बाबू स्पर्धेतील चार गट –

अ गट- मध्य प्रदेश, झारखंड, हैदराबाद
ब गट – रेल्वे, गुजरात, टीएनसीए प्रेसिडेंट इलेव्हन
क गट- मुंबई, हरियाणा, टीएनसीए इलेव्हन
ड गट – जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, बडोदा.